मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या लष्करासाठी नाटोने धाडलेला सुमारे 45 हजार टन इतका दारूगोळा रशियन लष्कराने नष्ट केला. आपल्या सैन्याने युक्रेनच्या लष्कराचे आणखी पाच ‘आर्म्स डेपो’ उद्ध्वस्त केल्याची माहिती रशियाने दिली आहे. याबरोबरच अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांकडून पाठविण्यात आलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांपैकी केवळ 30 टक्के इतकीच शस्त्रे युक्रेनी लष्कराच्या हाती लागत आहेत, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका अमेरिकन वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून याचे पडसाद उमटत आहेत.
युक्रेनच्या निकोलाईव्ह प्रांतातील वेझ्नीसिय्न्स्की भागातील तळावर नाटोने पुरविलेला सुमारे 45 हजार टन इतका दारूगोळा युक्रेनी लष्कराने जमा करून ठेवला होता. हा सारा दारूगोळा रशियन सैन्याने चढविलेल्या जबरदस्त हल्ल्यामध्ये नष्ट करण्यात आला, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. इतकेच नाही तर युक्रेनी लष्कराचा दारूगोळा व शस्त्रसाठा असलेले असे आणखी पाच ‘आर्म्स डेपो’ रशियन सैन्याने नष्ट करून टाकले, असा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. रशियाकडून रविवारी आलेल्या या माहितीनंतर अमेरिकेच्या एका वृत्तसंस्थेने युक्रेनला अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून पुरविल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांबद्दल धक्कादायक बातमी दिली आहे.
रशियाच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला आत्तापर्यंत सुमारे 54 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांचे सहाय्य मंजूर केले आहे. तर ब्रिटनने युक्रेनी लष्करासाठी सुमारे तीन अब्ज डॉलर्सचे सहाय्य घोषित केले असून युरोपिय महासंघाने 2.5 अब्ज डॉलर्सची शस्त्रे युक्रेनला पुरविणार असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये अत्याधुनिक रायफली, ग्रेनेडस्पासून ते रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे व मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम्स्चा समावेश आहे. हे सारे शस्त्रसहाय्य पोलंडमार्फत युक्रेनपर्यंत पोहचविण्यात येत असल्याचा दावा केला जातो. मात्र सीमेपार गेल्यानंतर ही शस्त्रास्त्रे युक्रेनी लष्कराच्या हाती धडपणे पोहोचत नाहीत. पाठविलेल्या शस्त्रास्त्रांपैकी अवघी 30 टक्के इतकीच शस्त्रास्त्रे युक्रेनी लष्कराच्या हाती पोहोचतात, असा दावा अमेरिकन वृत्तसंस्थेने केला आहे.
पाश्चिमात्यांची ही शस्त्रे भलत्याच ठिकाणी पोहोचत आहेत. शस्त्रास्त्रांचा अवैध व्यापार करणारे, राजकीय सत्तेशी निगडीत असलेला शस्त्रास्त्रांचे अवैध व्यवहार करणारे याचा लाभ घेत आहेत, असा आरोप सुरू झाला आहे. याआधी एका अमेरिकी वृत्तवाहिनीने युक्रेनसाठी पाठविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा गैरव्यवहार होत असल्याचे दावे केले होते. ही शस्त्रे नक्की कुठे जातात, ते कुणालाही धडपणे कळलेले नाही, असा दावा या वृत्तवाहिनीने केला होता. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकी वृत्तसंस्थेने दिलेली बातमी रशियन माध्यमांनी उचलून धरली आहे. एकीकडे अमेरिका व पाश्चिमात्य देश युक्रेनसाठी अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे धाडण्याची घोषणा करीत असताना, दुसऱ्या बाजूला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अजूनही आपल्या लष्कराला पाश्चिमात्यांकडून अपेक्षित सहाय्य पुरविले जात नसल्याचे आरोप करीत आहेत. अपुऱ्या लष्करी सहाय्यामुळे युक्रेनचे लष्कर बलाढ्य रशियन सैन्यासमोर टिकाव धरू शकत नसल्याची खंत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी वारंवार व्यक्त केली होती. यामुळे अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांनी पाठविलेल्या शस्त्रास्त्रांपैकी अवघी 30 टक्के इतकी शस्त्रे युक्रेनी लष्कराच्या हाती लागत आहे, ही धक्कादायक बाब समोर आल्याने त्याचे राजकीय पातळीवरही पडसाद उमटत आहेत. याच कारणामुळे मी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या निर्णयाविरोधात होते, असा दावा अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधीगृहातील सदस्या मार्जोरी टेलर ग्रीन यांनी केला आहे.