तेहरान – ‘जगात संघर्ष नसेल तर शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेतील कंपन्या पूर्णपणे सक्रीय राहू शकत नाहीत. या उद्योगातील माफियांचे हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी जगभरात संघर्ष पेटवित राहणे ही अमेरिकेची गरज बनलेली आहे. युक्रेन अमेरिकेच्या या धोरणाचा बळी ठरला आहे`, अशी आरोपांची फैर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी झाडली आहे.
पाश्चिमात्य देश व माध्यमांसह जगभरातील विश्लेषक युक्रेनमधील युद्धासाठी रशियावर आगपाखड करत असताना, इराणने मात्र या संघर्षाला अमेरिकेला जबाबदार धरले आहे. इराणच्या राजकारणाची सूत्रे हाती असलेल्या सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी मंगळवारी राष्ट्रीय वृत्तवाहिनीद्वारे इराणच्या जनतेला संबोधित केले. यामध्ये आयातुल्ला खामेनी यांनी युक्रेन-रशिया संघर्षावर इराणची भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली. गेल्या सहा दिवसांपासून युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवावा, असे आवाहन खामेनी यांनी केले.
त्याचबरोबर या संघर्षाचे मूळ युक्रेन-रशियाच्या सीमेवर नसून अमेरिकेत असल्याचा ठपका इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी केला. अमेरिकेतील प्रत्येक प्रशासन हे जागतिक संघर्षावर चालते व युक्रेनमधील संघर्ष देखील याला अपवाद नसल्याचे खामेनी म्हणाले. ‘युक्रेनमधील संघर्षातून आपण दोन महत्वाच्या गोष्टी शिकलो. पाश्चिमात्य देशांवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही आणि देशातील नेतृत्वाला जनतेचे समर्थन अतिशय महत्त्वाचे असते. कारण पाश्चिमात्य देशांनी त्रयस्थ देशात उभारलेली राजवट एका मृगजळासारखी असते`, असा टोला खामेनी यांनी लगावला.
इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी याद्वारे अफगाणिस्तानातील याआधीच्या अश्रफ गनी सरकार आणि पाश्चिमात्य समर्थक लष्कराकडे लक्ष वेधले. अमेरिकेच्या उपस्थितीतच तालिबानने गनी सरकार उलथून काबुलचा ताबा घेतला, याची आठवण खामेनी यांनी करुन दिली. तसेच अमेरिकेतील प्रशासन आणि या देशातील माफियांनी याआधीही जगभरात संघर्ष भडकविल्याचा गंभीरआरोप खामेनी यांनी केला. यासाठी इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी ‘आयएस`ची निर्मितीचा दाखला दिला. तसेच इतर देशांमध्ये नेतृत्वबदल घडवून त्याठिकाणी पाश्चिमात्य समर्थक नेत्याला बसविण्याचा प्रकार अमेरिकेने केल्याचा दावा खामेनी यांनी केला.
दरम्यान, व्हिएन्ना येथे अमेरिक व पाश्चिमात्य देश इराणबरोबरच्या अणुकरारबाबत वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा करीतआहेत. अशा परिस्थितीत, इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी अमेरिकेवर केलेली ही टीका लक्षवेधी ठरते.