रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबविण्याची वेळ गेलेली नाही

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

जेरूसलेम – ‘जबाबदार नेते म्हणून सध्या सुरू असलेला रक्तपात रोखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हा संघर्ष युद्धभूमीवरुन राजनैतिक वाटाघाटींकडे नेण्याची आवश्यकता आहे. अजूनही हे युद्ध थांबविण्याची वेळ निघून गेलेली नाही. अशा संघर्षाची किंमत फार मोठी असते याचा अनुभव आपण घेतलेला आहे. यावेळी या संघर्षाची किंमत अधिक भयंकर असू शकते’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला.

संघर्ष थांबविण्याची वेळजर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ हे बुधवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. जर्मनीची सूत्रे हातात घेतल्यानंतर चॅन्सेलर शोल्झ यांची ही पहिली इस्रायल भेट ठरते. रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष पेटण्याआधी शोल्झ यांची ही इस्रायल भेट निश्‍चित झाली होती. पण हा संघर्ष अधिकाधिक पेट घेत असताना जर्मन चॅन्सेलर शोल्झ आणि इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांच्यातील या भेटीकडे पाहिले जाते. शोल्झ आणि बेनेट यांच्यातील चर्चेतही रशिया-युक्रेन संघर्ष हा आघाडीचा मुद्दा होता.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकरात लवकर रोखण्याची आवश्यकता असल्याचे इस्रायली पंतप्रधान बेनेट म्हणाले. हा रक्तपात रोखण्यासाठी आवश्यक ते सारे काही करण्यासाठी इस्रायल तयार असल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी स्पष्ट केले. आपल्या संपूर्ण भाषणात इस्रायलच्या पंतप्रधानांनी युक्रेनचा उघड उल्लेख केला. पण रशियाचा उल्लेख करण्याचे इस्रायली पंतप्रधानांनी टाळले, याकडे जर्मन माध्यमे लक्ष वेधत आहेत.

इस्रायलने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवावी, अशी मागणी जर्मनीच्या चॅन्सेलरनी यावेळी केली. पत्रकारांनी देखील इस्रायलच्या पंतप्रधानांना हाच प्रश्‍न केला. तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने देखील इस्रायलकडे युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची मागणी केली होती. पण रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांबरोबर सहकार्य असलेल्या इस्रायलने बायडेन प्रशासनाला नकार कळविला होता. जर्मन चॅन्सेलर शोल्झ यांच्या मागणीवरही याबाबत इस्रायलने मोजूनमापून भूमिका घेतल्याचे सांगितले. तसेच युक्रेनला मानवी सहाय्य पुरवित असल्याचे सांगून पंतप्रधान बेनेट यांनी इस्रायलची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर या संघर्षाच्या काळात जर्मनीने आपल्या आत्तापर्यंतच्या भूमिकेत बदल करून युक्रेनला शस्त्रसहाय्य करण्याचा फारच धाडसी निर्णय घेतल्याचा टोला बेनेट यांनी लगावला.

रशिया-युक्रेन संघर्षाबरोरच इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींवरही जर्मनी व इस्रायलच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा पार पडली. इराणबरोरचा अणुकरार संपन्न व्हायला हवा, अशी अपेक्षा चॅन्सेलर शोल्झ यांनी व्यक्त केली. तर कुठलाही नवा अणुकरार इस्रायलला अमान्य असेल, असे पंतप्रधान बेनेट यांनी ठणकावले.

leave a reply