युक्रेनचे युद्ध म्हणजे युरोपिय देशांसाठी इशाराघंटा

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, रशियाच्या विरोधात जाण्याचे टाळणाऱ्या भारताला पुढच्या काळात याचे परिणाम सहन करावे लागतील. कारण रशिया व चीन यांच्यात घनिष्ठ सहकार्य प्रस्थापितझालेले आहे, असे स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ट् यांनी बजावले . नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसेना डायलॉगमध्ये बिल्ट् यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावरून प्रश्न केला होता. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. ‘युक्रेनच्या युद्धामुळे आत्ता कुठे पाश्चिमात्यांचे लक्ष आशियातील घडामोडींकडे लागले आहे. पण गेल्या दहा वर्षात आशियात बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचा युक्रेनच्या युद्धाशी थेट संबंध जोडता येणार नाही.

युक्रेनचे युद्ध म्हणजे युरोपिय देशांसाठी इशाराघंटा ठरते’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाश्चिमात्यांना आरसा दाखवला. युक्रेनच्या युद्धात भारताने स्वीकारलेली तटस्थ भूमिका म्हणजे रशियाला सहकार्य करण्यासारखेच ठरते, असा आक्षेप अमेरिका घेत आहे. अमेरिकेचे पाश्चिमात्य सहकारी देश देखील भारतावर तसेच आरोप करीत आहेत. स्वीडनच्या माजी पंतप्रधानांनी रायसेना डायलॉगमध्ये हा मुद्दा उपस्थित करून युक्रेन-रशियाबाबत भारताने स्वीकारलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. रशियाकडे झुकलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे परिणाम संभवतात, कारण रशिया व चीनचे घनिष्ठ सहकार्य आहे, याची जाणीव स्वीडन माजी पंतप्रधान बिल्ट् यांनी करून देण्याचा प्रयत्न केला होता. पण चीनची भारतविरोधी भूमिका व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया आत्ता सुरू झालेल्या नाहीत. गेल्या दहा वर्षापासून चीन हे करीत आहे, मात्र पाश्चिमात्य देश त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते, असे खरमरीत उत्तर जयशंकर यांनी यावेळी दिले.

आज तुम्ही सारेजण युक्रेनबाबत बोलत आहेत. पण आम्ही वर्षभरापूर्वी अफगाणिस्तानात काय झाले ते पाहिलेले आहे. अफगाणिस्तानातील सारी नागरी व्यवस्था उद्ध्वस्थ झालेली आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. एक आशियाई देश उद्ध्वस्त होत असताना, पाश्चिमात्य देशांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पण युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, आता पाश्चिमात्यांना आशियाची चिंता वाटू लागली आहे, या ढोंगावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नेमके बोट ठेवले. वेगळ्या शब्दात आशियाबाबत पाश्चिमात्य करीत असलेले दावे केवळ आपल्या हितापुरताच विचार करणारे असल्याची बाब याद्वारे जयशंकर यांनी लक्ष आणून दिली.

युक्रेनचे युद्ध म्हणजे युरोपसाठी इशाराघंटा ठरते. निदान पुढच्या काळात तरी युरोपने सावध होऊन आशियाकड अधिक गंभीरपणे पहावे, असे जयशंकर यांनी खडसावले आहे. काही आठवड्यांपूर्वी सौदी अरेबिया व कतारमध्ये पार पडलेल्या चर्चेत दोन्ही देशांनी असाच सूर लावला होता. आज पाश्चिमात्य देशांना युक्रेनची समस्या सर्वात मोठी वाटत आहे. पण अफगाणिस्तान, सिरिया, इराक, येमेन या देशांची दैना उडाली, तरी त्याला पाश्चिमात्यांनी फारशी किंमत दिली नव्हती. पण युक्रेनबाबत मात्र पाश्चिमात्य देश अतिशय संवेदनशील भूमिका स्वीकारत आहेत, अशी जळजळीत टीका सौदी व कतारने केली होती.

leave a reply