युक्रेनचे डोन्बास क्षेत्र यापूर्वीच रशियात विलिन करायला हवे होते

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

Ukraine's Donbas regionमॉस्को – रशियाने यापूर्वीच युक्रेनचे डोन्बास क्षेत्र रशियन संघराज्यात विलिन करून घेतले असते तर आता जी प्रचंड जीवितहानी झाली आहे ती झाली नसती, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन संघर्षासाठी 2014 साली युक्रेनमध्ये तत्कालिन राजवटीविरोधात झालेले बंड कारणीभूत असल्याचा दावाही केला. त्याचवेळी युक्रेनमधील राजवट व बाह्य शक्तींद्वारे युक्रेनच्या जवानांचा बळी देण्यासाठी वापर होत असल्याचा आरोपही पुतिन यांनी केला.

donbassशुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या लष्करी मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांच्या आईंची भेट घेतली. यावेळी झालेल्या संभाषणात त्यांनी रशियन मोहीमेत बळी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांना होत असलेल्या दुःखाची आपल्याला जाणीव असल्याच्या संवेदना व्यक्त केल्या. त्याचवेळी रशियाने डोन्बासच्या विलिनीकरणाबाबत आधीच निर्णय घेतला असता तर मोठी जिवितहानी झाली नसती, असा दावाही केला.

‘2014 साली मिन्स्क कराराच्या माध्यमातून डोनेत्स्क व लुहान्स्क पुन्हा युक्रेनशी जोडले जातील, असे रशियाला वाटले होते. रशिया त्यासाठी प्रयत्नही करीत होता. त्यावेळी रशियाला डोन्बासमधील परिस्थितीची व स्थानिक जनतेच्या इच्छांची पूर्णपणे कल्पना आली नव्हती. त्याचवेळेस डोन्बास रशियाला जोडले असते तर मोठी जीवितहानी टाळता आली असती. अनेक मुलांचे, सामान्य नागरिकांचे जीव वाचले असते’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितले. यावेळी रशिया-युक्रेन संघर्षाला 2014 साली युक्रेनमध्ये झालेले बंड कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला.

युक्रेनमधील राजवटीचा उल्लेख नवनाझी राजवट असा करून ही राजवट व युक्रेनच्या बाहेरील शक्ती युक्रेनी लष्करातील जवानांचा बळी म्हणून वापर करीत आहेत, असा आरोपही पुतिन यांनी केला. रशियाचा संघर्ष युक्रेनच्या जनतेशी नसल्याचेही पुतिन यावेळी म्हणाले. दरम्यान, रशियाच्या संरक्षण उद्योगाने युक्रेन संघर्षातून धडे घेऊन नवी शस्त्रे व यंत्रणा विकसित कराव्यात, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केल्याचेही समोर आले आहे.

leave a reply