युक्रेनच्या सरकारची राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या भ्रष्ट सहकाऱ्यांवर कारवाई

किव्ह – रशियाबरोबर घनघोर युद्ध सुरू असताना, युक्रेनच्या सरकारने राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सल्लागार, उपसंरक्षणमंत्री तसेच आपले प्रॉसिक्युटर जनरल यांना बडतर्फ केले. आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करून युक्रेनच्या सरकारने ही कारवाई केली. यामुळे अमेरिका व नाटोसह जगभरातून युक्रेनसाठी येत असलेल्या लष्करी आणि मानवतावादी सहाय्याच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. याआधीही युक्रेनचे सध्याचे सरकार भ्रष्ट असल्याचे गंभीर आरोप झाले होते.

zelensky tymoshenkoरशिया-युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचा दावा केला जात आहे. येत्या काळात या युद्धात युरोपिय देश देखील भरडले जातील, असे इशारे रशियन नेते देत आहेत. तर रशियाविरोधी युद्धात युक्रेनला कुठलीही कमतरता पडू नये, यासाठी अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक तसेच लष्करी सहाय्य पुरविले जात आहे. युरोपिय देशांनी देखील युक्रेनला लष्करी सहाय्य पुरवावे म्हणून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात नाटो सदस्य देशांच्या बैठकीचे आयोजन केले होते. याशिवाय जपान, दक्षिण कोरियासह आफ्रिकन, लॅटीन अमेरिकन देशांनीही युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविण्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे.

यामुळे रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता वाढेल, असे दावे केले जात आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देखील रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच युक्रेनला लष्करी, मानवतावादी सहाय्य पुरविण्याचे आवाहन करीत आहेत. पण गेल्या 48 तासांमध्ये युक्रेनच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासमोरील अडचणी वाढविणाऱ्या ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी युक्रेनच्या बांधकाम विभागाच्या उपमंत्र्यांना चार लाख डॉलर्सच्या गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली. झेलेन्स्की यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराची ही पहिली मोठी घटना होती.

याला काही तास उलटत नाही तोच झेलेन्स्की यांचे उपसल्लागार किरीलो टिमोशेंको यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाला. किरीलो यांनी पदाचा गैरवापर करून आलिशान व महागड्या मोटारी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर युक्रेनचे उपसंरक्षणमंत्री वाशेस्लाव्ह शापोवालोव्ह आणि प्रॉसिक्युटर जनरल ओलेक्सी सिमोनेंको यांच्यावरही आलिशान आयुष्यासाठी सरकारी पैशाचा वापर केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात किरीलो, वाशेस्लाव्ह आणि ओलेक्सी यांची सरकारमधून हकालपट्टी झाली आहे. पण ही फक्त सुरुवात असून लवकरच अशा प्रकारे भ्रष्टाचारात अडकलेल्या आणखी युक्रेनच्या नेत्यांवर कारवाई होईल, अशी माहिती समोर येत आहे.

leave a reply