राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणांमुळे अमेरिका – मेक्सिको सीमेवर अराजकसदृश स्थिती

-विरोधकांची टीका

वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवर अराजकसदृश स्थिती निर्माण झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी, सीमेवरील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेमुळे दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्यासाठी मोकळे रान मिळेल, असा इशाराही दिला. तर माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, बायडेन यांची धोरणे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकणारी असल्याचे बजावले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत घुसखोर निर्वासितांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अमेरिकेचा परराष्ट्र विभाग, अंतर्गत सुरक्षा विभाग व न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक आक्रमक निर्णय घेण्यात आले होते. ट्रम्प यांनी आक्रमकपणे राबविलेल्या निर्णयांमुळे अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची संख्या व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते. मात्र आता नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन व संसदेत बहुमत असलेल्या डेमोक्रॅट पक्षाने ट्रम्प यांचे निर्णय उलट फिरविण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.

या हालचालींमुळे अमेरिकेत येणार्‍या अवैध निर्वासितांच्या लोंढ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात एक लाखांहून अधिक जणांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. जानेवारी महिन्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल 28 टक्के असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. त्यात पालक नसलेली नऊ हजारांहून अधिक अल्पवयीन मुले असल्याचेही समोर आले आहे. घुसखोरी करणार्‍यांपैकी अनेकांना माघारी पाठविण्यात आले असले तरी सातत्याने मोठे लोंढे आदळत असल्याचे सांगण्यात येते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे लोंढे हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याची नाराजी स्थानिक अधिकारी व यंत्रणांकडून करण्यात येत आहे. सीमेवर असलेल्या राज्यांच्या प्रशासनांनीही बायडेन यांच्याविरोधात टीकेचा सूर आळवण्यास सुरुवात केली असून व्यवस्थेवर ताण येत असल्याचा ठपका ठेवला आहे. बायडेन प्रशासनाने सीमेवर आदळणारे निर्वासितांचे लोंढे हे संकट असल्याचे मान्य करावे व पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी संसदेतील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी केली आहे.

रिपब्लिकन पक्षाबरोबरच मेक्सिको सरकारनेही बायडेन यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. बायडेन यांच्या निर्णयांमुळे मानवी तस्करी करणार्‍या टोळ्या व अंमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या ‘कार्टेल्स’ना बळ मिळत असल्याचा आरोप मेक्सिको सरकारकडून करण्यात आला. मध्य अमेरिकी देशांमधून येणारे नागरिक बायडेन यांचा उल्लेख ‘मायग्रंट प्रेसिडंट’ असा करत असल्याकडे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांनी लक्ष वेधले आहे.

leave a reply