इराणच्या कुद्स फोर्सेसच्या प्रमुखांची अमेरिका व इस्रायलला धमकी

जेद्दा – गेल्या वर्षी कुद्स फोर्सेसचे माजी प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी यांची हत्या घडविणार्‍या गुन्हेगार अमेरिकेला याची किंमत चुकती करावी लागेल. यासाठी गुन्हेगार अमेरिकेचा इराण चुराडा करील आणि योग्यवेळी त्याचा आवाज सर्वांनाच ऐकू येईल, अशी धमकी मेजर जनरल कानी यांनी दिली. अमेरिका नव्याने इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी धडपडत असताना, इराणच्या कुद्स फोर्सच्या प्रमुखांनी दिलेली ही धमकी लक्ष वेधून घेत आहे.

इराणने अणुकरारांच्या शर्तींचे पालन करावे व त्यानंतरच अणुकरारावरील चर्चा पुढे जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून बजावण्यात येत आहे. अमेरिका एकतर्फी सवलती देऊन नव्याने अणुकरार करील, या भ्रमात राहू नये, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिला होता. तर इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी अणुकरारातून बाहेर पडणार्‍या अमेरिकेने आपली चूक निस्तारावी व या करारात सहभागी व्हावे, अशी मागणी केली आहे.

यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात अणुकरारावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये यावर अप्रत्यक्षरित्या वाटाघाटी सुरू असल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली होती. तर बायडेन प्रशासनाने इराणबरोबर हा करार करण्याची पूर्ण तयारी केल्याचे आरोप अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांकडून केले जात आहेत.

अशा परिस्थितीत इराणचे लष्करी अधिकारी मात्र अमेरिकेला धमक्या देण्याचे सत्र रोखायला तयार नाहीत. कुद्स फोर्सेसच्या प्रमुखांनी अमेरिकेला दिलेली नवी धमकी याची साक्ष देत आहे. अमेरिकाच नाही, तर इस्रायललाही कुद्स फोर्सेसचे कमांडर कानी यांनी धमकावले आहे. ‘जगातील सर्वाधिक शस्त्रसाठा असलेला इस्रायल इराणला घाबरुन स्वत:भोवती एक मीटर रूंद आणि सहा मीटर उंच अशी सुरक्षाभिंत उभारत आहे. पण यानंतरही इस्रायल सुरक्षित राहणार नाही. कारण इराण ही भिंतच नष्ट करील’, असे कानी यांनी बजावले. कुद्स फोर्सेसच्या प्रमुखांनी अमेरिका व इस्रायलला दिलेली धमकी इराणी माध्यमांनी उचलून धरली आहे.

इराणमधल्या मशहाद शहरात कमांडर कानी यांनी अमेरिका व इस्रायलला धमक्या देत असताना, सौदीवर हल्ले चढविणार्‍या हौथींच्या मागे इराण असल्याचा दावा केला होता. मात्र याबाबतची बातमी केवळ सौदी अरेबियाच्या वृत्तसंस्थेने दिलेली आहे. इतर वृत्तसंस्थांकडून याला दुजोरा मिळालेला नाही. अमेरिका, सौदी व युएईने इराणवर हौथींना आर्थिक व लष्करी सहाय्य पुरवित असल्याचे आरोप केले होते. हौथी बंडखोरांनी सौदीवर प्रक्षेपित केलेले ड्रोन्स व क्षेपणास्त्रे इराणी बनावटीची असल्याचा दावा सौदीने केला होता. त्याचबरोबर इराणमधून शस्त्रास्त्रे घेऊन येमेनमध्ये दाखल होणारी इराणची जहाजेही ताब्यात घेतली होती. पण इराणचे नेते व लष्करी अधिकार्‍यांनी सौदीचे हे आरोप फेटाळले होते. पण कुद्स फोर्सेसच्या प्रमुखांनीच याची कबुली दिल्याचा दावा ‘अरब न्यूज’ने केला आहे.

बायडेन यांच्या प्रशासनाने हौथींना दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरच्या काळात हौथींचे सौदी अरेबियावरील हल्ले तीव्र बनले आहेत. याची गंभीर दखल सौदीने घेतली असून पुढच्या काळात सौदीची येमेनमधील हौथींवर अधिक आक्रमक कारवाई सुरू होईल, असे संकेत मिळत आहेत. मात्र सौदीला शस्त्रे न पुरवण्याची घोषणा करून बायडेन प्रशासनाने सौदीवरील दडपण वाढविले आहे.

leave a reply