तैवानला स्वसंरक्षणासाठी अमेरिका आवश्यक ते सहाय्य पुरविल

- पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय

वॉशिंग्टन – ‘याआधीच्या अमेरिकेच्या प्रशासनांप्रमाणे बायडेन प्रशासन देखील तैवानला स्वसंरक्षणासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. तैवानची संरक्षणविषयक क्षमता भक्कम करण्यासाठी आवश्यक लष्करी सहकार्य पुरविले जाईल’, अशी घोषणा अमेरिकेच्या पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केली. मात्र तैवानला सहाय्याचे आश्‍वासन देत असताना, ‘वन चायना पॉलिसी’ला अमेरिकेचा पाठिंबा असल्याची महत्त्वाची घोषणा किरबाय यांनी केली आहे. चीनचे हे धोरण मान्य असल्याचे जाहीर करून पेंटॅगॉनने तैवानला धक्का दिल्याचे समोर येत आहे.

गेल्या आठवड्यात जपानचे पंतप्रधान होशिहिदे सुगा यांनी अमेरिकेचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली होती. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत असलेल्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये ‘ईस्ट आणि साऊथ चायना सी’, सेंकाकू द्विपसमुहाच्या वादाबरोबर जपानच्या पंतप्रधानांनी तैवान, हॉंगकॉंग, झिंजियांग या मुद्यांवरही चर्चा केली. पण जपानच्या पंतप्रधानांनी तैवानचा मुद्यावर केलेली चर्चा सर्वात ठळक घटना ठरली होती.

तैवानच्या आखातातील शांतता आणि स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान सुगा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. गेल्याच आठवड्यात चीनच्या २५ विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या पाच दशकात पहिल्यांदाच जपानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या चर्चेत थेट तैवानचा काढलेला मुद्दा लक्षवेधी ठरला होता.

याबाबत जपानच्या वृत्तवाहिनीने पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांना प्रश्‍न विचारला. तैवानच्या आखातात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका व जपान नेमकी कोणती भूमिका घेणार, अशी विचारणा जपानच्या पत्रकाराने केली. त्यावर, ‘‘तैवानच्या मुद्यावर काही बोलण्याआधी, चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला अमेरिकेचा पाठिंबा आहे’’, असे किरबाय यांनी सुरूवातीलाच जाहीर करून टाकले.

चीनच्या या वन चायना पॉलिसीमध्ये तैवान हा वेगळा देश नसून तो चीनचाच भूभाग असल्याचे स्पष्टपणे मांडण्या आलेले आहे. अमेरिकेचे आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या वन चायना धोरणाला आव्हान दिले होते. पण बायडेन प्रशासन तसे करणार नाही, असा संदेश किरबाय देत आहेत. चीनची लढाऊ विमाने व युद्धनौका तैवानच्या हद्दीत वारंवार घुसखोरी करीत आहेत व चीन वारंवार युद्धसराव करून तैवानला दहशतीखाली ठेवत आहे. अशा परिस्थितीत बायडेन प्रशासनाने वन चायना धोरणाचा पुरस्कार करून आपण चीनच्या विरोधात जाण्यास तयार नसल्याचे संकेत दिले आहेत. चीनने हल्ला चढविला तर अमेरिका तैवानचे संरक्षण करणार नाही, केवळ तैवानच्या संरक्षणासाठी सहाय्य करील, असा छुपा संदेशही किरबाय यांच्या विधानातून दिला जात आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे कितीही दावे केले, तरी ते चीनच्या विरोधात ठोस कारवाई करणार नाहीत, असा संशय काही जबाबदार विश्‍लेषक व्यक्त करीत आले आहेत. त्याचा पुरेपूर लाभ चीनसारखा मतलबी देश उचलत आहे. यामुळे सध्या तरी तैवानला स्वसंरक्षणासाठी अमेरिकेवर विसंबून राहता येणार नाही, असे दिसू लागले आहे. मात्र जपान व या क्षेत्रातील इतर देशांनी तैवानच्या मागे ठामपणे उभे राहण्याची तयारी केली असून या देशांनी चीनच्या विरोधात केलेली मोर्चेबांधणी हे चीनच्या समोर खडे ठाकलेले नवे आव्हान ठरू शकते.

leave a reply