रशियाच्या सुरक्षाविषयक चिंता दूर झाल्याखेरीज युक्रेनची समस्या सुटणार नाही

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को/पॅरिस – आपल्या सुरक्षेबाबत रशियाला वाटत असलेल्या चिंतेचे निराकरण झाले, तरच युक्रेनची समस्या सुटू शकते, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले आहे. सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत पुतिन यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार करतानाच रशियाचे लष्कर युक्रेनचा ताबा घेण्यासाठी तैनात करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रसंघातील एका बैठकीत रशियाची युक्रेनवर ताबा मिळविण्याची योजना नसल्याचा खुलासा रशियन राजदूतांनी केला आहे.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याला सहा दिवस उलटले असून दोन देशांमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक चिघळत चालल्याचे चित्र समोर येत आहे. अमेरिका, युरोप व मित्रदेश युक्रेनच्या पाठीशी उभे असून त्याला सर्व प्रकारची आर्थिक व लष्करी मदत पुरविण्यात येत आहे. त्याचवेळी रशिया युक्रेनची राजधानी किव्हसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळविण्यासाठी हल्ले चढवित असल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांबरोबर फोनवरून केलेली चर्चा महत्त्वाची ठरते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली. ‘युक्रेनच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यासाठी रशिया तयार आहे. या वाटाघाटींना अपेक्षित यश मिळेल, अशी आशा आहे. युक्रेन समस्येवर तोडगा निघणे शक्य आहे. मात्र त्यासाठी आपल्या सुरक्षेबाबत रशियाला वाटत असलेल्या चिंतांकडे योग्य लक्ष देऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. यात रशियाचा क्रिमिआवरील हक्क मान्य करणे तसेच युक्रेनचे निशस्त्रीकरण व नाझी गटांपासून त्या देशाला मुक्त करणे यांचा समावेश आहे. त्याचवेळी युक्रेन बाह्य प्रभावापासून अलिप्त राहिल, याचीही हमी द्यायला हवी’, अशी मागणी रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली.

रशियाचे लष्कर युक्रेनमध्ये नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत नसल्याचा दावाही पुतिन यांनी यावेळी केला. युक्रेनमधील आक्रमक राष्ट्रवादी गट धोकादायक असून ते सामान्य नागरिकांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर करीत असल्याचा आरोप रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. या गटांनी नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या लष्करी व संरक्षणयंत्रणा तैनात केल्या असून डोन्बासमधील शहरांमध्ये जोरदार हल्ले सुरू केल्याचेही पुतिन यांनी यावेळी बजावले.

leave a reply