जगभरातील उलथापालथींचा भारताच्या विकासावर परिणाम होणार नाही

-आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेचा दावा

नवी दिल्ली – जागतिक पातळीवर भडकलेली महागाई, युक्रेनचे युद्ध आणि तैवानच्या आखातातील तणाव या संकटांनी जागतिक अर्थव्यवस्थेला घेरले आहे. याबरोबरच पुरवठा साखळी बाधित झाली असून यामुळे अमेरिका व चीनसह सर्वच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था घसरणीला लागलेल्या आहेत. अशा परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करीत असून पुढच्या दोन वर्षातही भारताची अर्थव्यवस्थेवर जागतिक पातळीवरील या घडामोडींचा परिणाम होणार नाही, असा दावा मुडीज्‌‍ या गुंतवणूकविषयक पतमानांकन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने केला. पण भारतीय विश्लेषक मात्र प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांच्या घसरणीचा परिणाम भारतालाही सहन करावा लागेल, अशी सावध प्रतिक्रिया देत आहेत. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक घसरणीचा भारतावर विशेष परिणाम होणार नाही.

India's growth2022-23 या वित्तीय वर्षात भारताची अर्थव्यवस्था सुमारे 7.6 टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील. तर 2023-24च्या वित्तीय वर्षात 6.3 टक्के इतक्या विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करील, असा दावा मुडीज्‌‍ने केला आहे. आधीच्या काळात भारतातील गुंतवणुकीबाबत नकारात्मक कल दाखविणाऱ्या मुडीज्‌‍ने काही महिन्यानंतर भारतातील गुंतवणुकीबाबतचे मानांकन सुधारले असून भारतीय अर्थव्यवस्थेवर अधिक विश्वास दाखविल्याचे दिसते. भारताची अर्थव्यवस्था एक-दोन क्षेत्रांवर अवलंबून नाही.

अर्थव्यवस्थेचे विविध आधार ही भारताची फार मोठी शक्ती ठरते. यामुळे युक्रेनचे युद्ध, जागतिक पातळीवरील महागाई यांचा कुठलाही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही, नोंदविला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेकडे या समस्यांचा सामना करण्याची क्षमता आहे, असा निष्कर्ष मुडीज्‌‍ने नोंदविला आहे. असे असले तरी भारतीय विश्लेषक मात्र जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक घसरणीचा व अनिश्चिततेचा देशाच्या निर्यातीवर परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त करीत आहेत. आर्थिक संकटांमुळे विकसित देशांच्याही अर्थव्यवस्थांची घसरण सुरू झाली आहे. अशा काळात या देशांमधून येणाऱ्या मागणीतही घट होत आहे. ही बाब भारताच्या निर्यातीवर परिणाम करीत असून ऑगस्ट महिन्यात याचे संकेत मिळाले, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले. ऑगस्ट महिन्यात भारताच्या व्यापारी निर्यातीत 1.15 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. हा कल चिंता वाढविणार असल्याचे विश्लेषक बजावत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या वर्तमानपत्राने अमेरिका व चीनसह सर्वच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांची घसरण सुरू असतानाच, भारताची अर्थव्यवस्था विकास करीत आहे, याची नोंद घेतली. भारताची अर्थव्यवस्था केवळ निर्यातीवर आधारलेली नाही. तर भारताकडे प्रचंड प्रमाणात अंतर्गत पातळीवर फार मोठी मागणी आहे. यामुळे निर्यातीवर आधारलेल्या इतर देशांच्या अर्थव्यवस्थांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या भारतासमोर येणार नाहीत. त्याचवेळी भारताच्या सरकारने स्वीकारलेल्या कल्याणकारी धोरणांमुळे जनतेला बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला असून त्याचा सुपरिणाम या देशाच्या आर्थिक कामगिरीवर होत असल्याचा दावा या अमेरिकी वर्तमानपत्राने केला आहे.

leave a reply