शेकडो तालिबानी दहशतवाद्यांना संपविणारे अमेरिकेचे हवाई हल्ले यापुढेही सुरू राहतील

- अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचा इशारा

हवाई हल्लेवॉशिंग्टन/दोहा/काबुल – अफगाणी लष्कराच्या हवाई हल्ल्यात गेल्या २४ तासात ३६१ तालिबानी दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जाते. अफगाणी लष्कराबरोबर अमेरिकेची बी-५२ बॉम्बर्स तसेच एसी१३० गनशिप तालिबानवर घणाघाती हल्ले चढवून शेकडोंच्या संख्येने दहशतवाद्यांना ठार करीत आहे. अमेरिकेचे हे हवाई हल्ले म्हणजे दोहा कराराचे उल्लंघन ठरते, असा आरडाओरडा तालिबानने सुरू केला आहे. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानच्या सरकारला सहाय्याचे आश्‍वासन दिले होते व ते यापुढेही पाळले जाईल, असे सांगून पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी हे हवाई हल्ले थांबणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

अमेरिकेची बी-५२ बॉम्बर्स, एस१३० गनशिप विमाने अफगाणिस्तानातील तालिबानच्या ठिकाणांवर हल्ले चढवित आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीच अफगाणिस्तानच्या सरकारच्या सहाय्यासाठी ही विमाने रवाना करण्याचे आदेश दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यातच आता अमेरिकेची एफ-१५ई, एफ-१६, एफ१८ लढाऊ विमाने आणि एमक्यू९ रिपर ड्रोन देखील तालिबानवरील हल्ल्यासाठी सज्ज होत असल्याचा दावा केला जातो.

हवाई हल्लेगेल्या काही दिवसांपासून पर्शियन आखातात तैनात असलेली अमेरिकेची ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ विमानवाहू युद्धनौका पाकिस्तानच्या सागरी क्षेत्राजवळ पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे स्पेशल फोर्सेसचे जवान कंदहार प्रांतात दाखल झाल्याचा दावा पाकिस्तानचे पत्रकार करू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका तालिबानवरील हल्ले तीव्र करणार असल्याची शक्यता वर्तविली जाते. अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिली आणि सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांच्यातही अफगाणिस्तानच्या मुद्यावर नुकतीच चर्चा पार पडली. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. ‘कायमस्वरुपी नाही, पण अफगाण सरकार आणि लष्कराला अमेरिकेचे हवाई हल्ल्यांचे सहाय्य सुरू राहतील’, असा इशारा कर्बी यांनी दिला.

शेकडो नागरिकांचा बळी घेणार्‍या आणि लाखो जणांना विस्थापित करणारा हा संघर्ष थांबवावा, यासाठी अमेरिकेचे अफगाणिस्तानविषयक विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी तालिबानला बजावले. येत्या काळात तालिबानने लष्करी सामर्थ्याच्या बळावर अफगाणिस्तानचा ताबा घेतला तर अमेरिका तालिबानला मान्यता देणार नसल्याचा इशारा खलिलझाद यांनी दिला. तालिबानने हल्ले थांबवून अफगाणिस्तानच्या गनी सरकारबरोबर चर्चा सुरू करावी, असे आवाहन खलिलझाद यांनी केले.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानच्या सहा मुख्य शहरांचा ताबा घेतल्याचा दावा केला जातो. गेल्या महिन्याभरात लश्करगह, कंदहार, हेरात आणि कुंदूझ शहरातील संघर्षात १८३ जणांचा बळी गेला तर १,१८१ जण जखमी झाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी म्हटले आहे. तर एकट्या कंदहार प्रांतातील ७२ तासांच्या संघर्षात २० मुलांचा बळी गेला व १३० मुले जखमी झाली आहेत. खोस्त, पाकतिया प्रांतातही तालिबान मुलांना लक्ष्य करीत असल्याचे ताशेरे संयुक्त राष्ट्रसंघाने ओढले.

leave a reply