अमेरिका व नाटोकडून युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रांसह लढाऊ विमाने पुरविण्याच्या हालचाली

रशियाचा खरमरीत इशारा

Patriot-Missileवॉशिंग्टन/किव्ह – रशिया युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र करीत असतानाच अमेरिकेसह नाटोने युक्रेनला नवी व प्रगत शस्त्रे पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. रोमानियात सुरू असलेल्या नाटोच्या विशेष बैठकीत अमेरिका व नाटो सदस्य देशांच्या मंत्र्यांकडून याचे संकेत देण्यात आले. यात अमेरिकेच्या ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रांसह ‘एफ-१६’ व ‘मिग-२९’ या लढाऊ विमानांचा समावेश आहे. अमेरिका व नाटोच्या या हालचालींवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. युक्रेनमधील वाढत्या हस्तक्षेपामुळे अमेरिकेला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, असे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी बजावले.

अमेरिकेसह नाटो सदस्य देशांनी युक्रेनला जवळपास २५ अब्ज डॉलर्सचे शस्त्रसहाय्य पुरविले आहे. यात लांब पल्ल्याची रॉकेट्स, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, नॅसॅम्स हवाईसुरक्षा यंत्रणा, हेलिकॉप्टर्स यांचा समावेश आहे. मात्र या प्रचंड शस्त्रपुरवठ्यानंतरही युक्रेनकडून सातत्याने नवनव्या यंत्रणांची मागणी सुरू आहे. गेल्या महिन्याभरात रशियाने युक्रेनवर केलेल्या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर युक्रेनने अधिकच आक्रमकपणे आपल्या मागण्या पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे.

sergei ryabkovयुक्रेन अमेरिकेसह युरोपिय देशांकडे सातत्याने प्रगत क्षेपणास्त्रे व लढाऊ विमानांची मागणी करीत आहे. या मागण्यांवर अमेरिका व नाटो सदस्य देशांमध्ये चर्चा सुरू झाली असून पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पर्याय समोर असल्याचे सांगितले. यात पॅट्रियॉट क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचे संकेत अमेरिका तसेच युरोपातील सूत्रांनी दिले आहेत. दुसऱ्या बाजूला युरोपातील नाटो सदस्य देशांनी युक्रेनला लढाऊ विमाने पाठविण्यासाठी हालचालीही सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या ‘ब्लूमबर्ग’ या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले.

अमेरिका व नाटोच्या या हालचालींवर रशियाने खरमरीत इशारा दिला आहे. अमेरिका युक्रेनमधील हस्तक्षेप व चिथावणीखोर कारवाया ज्या प्रमाणात वाढविल त्या प्रमाणात त्याला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, असे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री रिब्कोव्ह यांनी बजावले. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनीही पॅट्रियॉट क्षेपणास्त्रांच्या मुद्यावरून अमेरिका व नाटोला गंभीर इशारा दिला आहे.

leave a reply