‘साऊथ चायना सी’मधील संयुक्त युद्धसरावाद्वारे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा चीनला संदेश

‘साऊथ चायना सी’मधील संयुक्त युद्धसरावाद्वारे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा चीनला संदेश

कॅनबेरा – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या युद्धनौकांचा सराव नुकताच पार पडला. व्हिएतनाम आणि मलेशियाच्या सागरी हद्दीत इंधनाचे उत्खनन करणाऱ्या चीनच्या जहाजाजवळील क्षेत्रात हा युद्धसराव आयोजित करुन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने चीनला खरमरित संदेश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनची आक्रमकता वाढत चालली होती. या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा हा संयुक्त युद्धसराव लक्षवेधी ठरतो.

अमेरिकेच्या नौदलातील दोन युद्धनौका ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात गस्त घालत असल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेने या क्षेत्रातील मोहीम पूर्ण केल्यानंतर ‘युएसएस अमेरिका’ ही अम्फिबियस विमानवाहू युद्धनौका आणि हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज असलेली ‘युएसएस बंकर हिल’ या दोन युद्धनौकांना अमेरिकी नौदलाने या क्षेत्रात तैनात केले होते. मंगळवारी ऑस्ट्रेलियन नौदलाच्या ‘एचएमएएस पॅनरमॅटा’ या युद्धनौकेने या सागरी क्षेत्राचा प्रवास करुन अमेरिकी युद्धनौकांबरोबर सराव केला. ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्रालयाने या युद्धसरावाची माहिती प्रसिद्ध केली.

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन युद्धनौकांचा हा सराव नियोजित वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आला होता, असेही ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. हा युद्धसराव ‘साऊथ चायना सी’तील वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक होता, असे यावेळी अमेरिकेने म्हटले आहे. जगभरातील जहाजांच्या वाहतुकीवर नजर ठेवणाऱ्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन युद्धनौकांचा सराव पार पडला, त्या ठिकाणाहून काही अंतरावर गस्तिनौकांच्या सुरक्षेत चिनी जहाजे इंधन उत्खनन करीत होते.

चीनचे हे इंधन उत्खनन व्हिएतनाम आणि मलेशियाच्या सागरी क्षेत्रात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही आग्नेय आशियाई देशांबरोबर चीनचा वाद भडकला आहे. चीनला अरेरावीला आव्हान देणाऱ्या या दोन्ही देशांच्या ‘साऊथ चायना सी’वरील सार्वभौम अधिकाराला अमेरिकेने समर्थन दिले आहे. यापार्श्वभूमीवर सदर सागरी क्षेत्रातील अमेरिका व ऑस्ट्रेलियन नौदलाचा हा युद्धसराव व्हिएतनाम आणि मलेशियाचा विश्वास वाढविणारा ठरतो.

leave a reply