चीनच्या विरोधात अमेरिका-ऑस्ट्रेलियाची ‘स्ट्रॅटेजिक प्लानिंग’

- संयुक्तरित्या क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करणार

कॅनबेरा – येत्या काळात चीनकडून तैवानवर हल्ल्याची शक्यता वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत, चीनच्या हल्ल्यांना संघटीतपणे कसे प्रत्युत्तर द्यायचे, याविषयी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया धोरणात्मक योजना तयार करीत आहेत. ऑस्ट्रेलियातील अमेरिकेचे प्रभारी मायकल गोल्डमन यांनी ही माहिती दिली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने अमेरिकेच्या सहाय्याने गायडेड क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करीत असल्याची घोषणा केली आहे.

चीनपासून तैवानच्या सुरक्षेला असलेला धोका वाढत आहे. येत्या काही वर्षांमध्ये किंवा महिन्यांमध्ये चीन लष्करी कारवाई करून तैवानचा ताबा घेऊ शकतो, असे इशारे गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे लष्करी अधिकारी आणि विश्‍लेषक देत आहेत. तर चीनने देखील तैवानच्या हवाई क्षेत्रातील आपल्या लढाऊ, बॉम्बर आणि टेहळणी विमानांच्या घुसखोरी वाढविली आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या तब्बल २० विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. याशिवाय चीनने तैवानजवळच्या आपल्या किनारपट्टीवर नौदलाचा सरावही सुरू केला होता. या युद्धसरावात चीनच्या लष्कराने क्षेपणास्त्रे डागली होती.

या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या तैवानवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया स्ट्रॅटेजिक प्लानिंग करीत असल्याची माहिती अमेरिकी दूतावासाचे प्रभारी गोल्डमन यांनी दिली. ‘फक्त लष्करीच नाही तर धोरणात्मक आघाडीवरही अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया एकत्र आहेत. जेव्हा धोरणात्मक योजनेचा भाग येतो तेव्हा तैवानसारख्या महत्त्वाच्या घटकाचा विचार होतो’, असे गोल्डमन यांनी ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

गोल्डमन यांच्या या घोषणेच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी अमेरिकेसह क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करीत असल्याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षाविषयक आवश्यकता लक्षात घेऊन या क्षेपणास्त्र यंत्रणेची निर्मिती केली जाईल, असे डटन यांनी सांगितले. याने ऑस्ट्रेलिया सज्ज झालाल्याने ‘ग्लोबल सप्लाय चेन’ला असलेल्या धोक्याचा सामना करता येईल, असा इशारा डटन यांनी दिला. थेट नामोल्लेख टाळला असला तरी ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील चीनपासून असलेल्या धोक्यांकडे बोट दाखवून डटन हा दावा करीत असल्याचे दिसते.

वेगाने बदलत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत आपल्या देशाला या क्षेपणास्त्र यंत्रणेची आवश्यकता असल्याचे सूचक विधान ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केले. यामुळे ऑस्ट्रेलियाचे सार्वभौमत्व सुरक्षित होईल, असा दावा पंतप्रधान मॉरिसन यांनी केला आहे.

चीनच्या आक्रमकतेमुळेच भारत व ऑस्ट्रेलियाला धोरण बदलावे लागले – अमेरिकी अभ्यासगटाचा निष्कर्ष

वॉशिंग्टन – कोरोनाच्या काळात चीनने भारत आणि ऑस्ट्रेलिया विरोधात केलेल्या आक्रमक कारवायांमुळेच या दोन्ही देशांना आपल्या चीनविषयक भूमिकेत बदल करावा लागला, असा दावा ‘सेंटर फॉर न्यू अमेरिकन सिक्युरिटी’ या अमेरिकी अभ्यासगटाने केला. त्याचबरोबर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या मित्र व सहकारी देशांना एकत्र आणणे, अमेरिकेसाठी अतिशय आवश्यक आहे, असा सल्ला या अभ्यासगटाने दिला आहे.

लिझा कर्टिस आणि स्टिफन टँकेल यांनी तयार केलेल्या या अहवालात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य आवश्यक असेल तर अमेरिकेला भारत, जपान व ऑस्ट्रेलियासारख्या लोकशाही देशांचे सहाय्य घ्यावे लागेल, असे बजावले आहे. या चारही देशांनी राजनैतिक, आर्थिक आणि लष्करी आघाडीवर द्विपक्षीय, त्रिपक्षीय आणि क्वाडद्वारे परस्परांमधील सहकार्य वाढविणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष या अभ्यासगटाने नोंदविला आहे.

leave a reply