पाकिस्तानला हाताशी धरून अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाची भारतविरोधी खेळी

वॉशिंग्टन – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकी अधिकाऱ्यांशी बोलताना जनरल बाजवा यांनी काश्मीरच्या प्रश्नावर लक्षवेधी विधाने केली. भारताची तयारी असेल, तर पाकिस्तान काश्मीरच्या प्रश्नावर पुढे जाणारी चर्चा करायला तयार आहे, असा दावा जनरल बाजवा यांनी केला. त्यांचे हे दावे प्रसिद्ध होत असतानाच, अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत डोनाल्ड ब्लोम यांनी ‘पीओके’ अर्थात पाकिस्तानव्याप्त काश्मीरला भेट दिली. इतकेच तर या भागाचा ‘आझाद जम्मू काश्मीर’ असा उल्लेख करून अमेरिकी राजदूतांनी पाकिस्तानला खूश करून टाकले. यामुळे अमेरिकेचे बायडेन प्रशासन काश्मीरबाबत भारतावर दडपण टाकण्याची जुनी खेळी नव्याने सुरू करीत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

Us Biden administrationआपल्या अमेरिका भेटीत जनरल बाजवा यांनी पाकिस्तानचे लष्कर राजकारणापासून दूर राहणार असल्याचे दावे केले आहेत. इतकेच नाही तर काश्मीरच्या मुद्यावर भारताशी पुढे जाणारी चर्चा करण्यासाठी आपला देश तयार असल्याचे दावे देखील जनरल बाजवा यांनी केले. याआधीही जनरल बाजवा यांनी पाकिस्तानचे लष्कर भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्याच्या विरोधात नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी फार वेगळी भूमिका मांडलेली नसल्याचे दिसते. तरीही माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जात आहे. याचे कारण बायडेन प्रशासनाने पुन्हा एकदा पाकिस्तानचे महत्त्व वाढवून भारतावर दडपण टाकण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. सोमवारी अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांनी ‘पीओके’ला भेट देऊन याचा आझाद काश्मीर असा उल्लेख केला होता. भारताला चिथावणी देण्यासाठीच हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

याद्वारे बायडेन यांचे प्रशासन भारतावरील दबाव वाढविण्याची तयारी करीत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई दलातील एफ-16 विमानांसाठी 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर पीओकेमधील अमेरिकेच्या राजदूतांची भेट, हा योगायोग ठरत नाही. तर अमेरिकेचे भारतविरोधी डावपेच यातून स्पष्ट होत आहेत. पुढच्या काळात पाकिस्तानचे महत्त्व अधिक प्रमाणात वाढविण्यासाठी बायडेन प्रशासनाकडून पावले उचलली जाऊ शकतात. पाकिस्तानी लष्करप्रमुखांचा अमेरिका दौरा ही बायडेन प्रशासनाच्या या धोरणांचा भाग ठरत असल्याचे दिसते.

आपल्या या अमेरिका दौऱ्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा आपल्या देशाला भारताबरोबर सलोखा अपेक्षित असल्याचे चित्र उभे करू पाहत आहेत. तसेच भारताबरोबर चर्चेची तयारीही दाखवित आहेत. सध्या भारताबरोबर चर्चा व सहकार्य प्रस्थापित करण्याखेरीज पाकिस्तानसमोर दुसरा पर्यायच राहिलेला नाही. कारण पाकिस्तानच्या प्रतिष्ठेबरोबरच या देशाची अर्थव्यवस्थाही रसातळाला गेलेली आहे. अशा परिस्थितीत भारताबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान धडपडत आहे. पण पाकिस्तानच्या सरकारनेच भारताबरोबर सर्वच पातळ्यांवरील चर्चा रद्द करण्याची घोषणा केली होती. पुन्हा ही चर्चा सुरू करायची असेल, तर पाकिस्तानला आधी दहशतवाद पूर्णपणे रोखावा लागेल आणि दहशतवाद्यांवर कारवाई करावी लागेल, अशी भारताची मागणी आहे. ती मान्य झाल्याखेरीज पाकिस्तानशी चर्चा करून भारत या देशाला प्रतिष्ठा बहाल करायला तयार नाही.

अशा परिस्थितीत भारतविरोधी राजकारणासाठी बायडेन प्रशासन पाकिस्तानचा वापर करण्याचा डाव खेळत आहे. आधीच्या काळातही अमेरिकेने अशा स्वरुपाची खेळी करून भारताचा रोष ओढावून घेतला होता. भारतच नाही तर पाकिस्तानशी नव्याने सहकार्य प्रस्थापित करणे म्हणजे नव्या अपेक्षाभंगाची तयारी करणे ठरेल, असे इशारे अमेरिकी विश्लेषक देत आहेत. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानने वरकरणी अमेरिकेला सहकार्य केले, पण गुप्तपणे तालिबानला सहाय्य केले होते, याची आठवण अमेरिकी विश्लेषकांचा गट करून देत आहे. अशा देशावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून बायडेन प्रशासन घोडचूक करीत असल्याचा इशारा या अमेरिकी विश्लेषकांनी दिला आहे.

बायडेन प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार, युक्रेनच्या युद्धानंतर भारताने रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचे नाकारले होते. तसेच रशियाकडून इंधनाची खरेदी वाढवून भारताने आपल्यावर बायडेन प्रशासनाच्या धमक्यांचा परिणाम होणार नाही, याचीही जाणीव करून दिली होती. तसेच भारताच्या कितीतरी अधिक पटीने युरोपिय देश रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहेत, याची जाणीव परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेला करून दिली होती. यानंतर बायडेन प्रशासनाने भारताच्या विरोधात हालचाली अधिक तीव्र केल्या आणि पाकिस्तानचे महत्त्व वाढविणारी धोरणे स्वीकारल्याचे दिसत आहे. भारताने याची दखल घेतली आहे. विशेषतः एफ-16 विमानांसाठी बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला दिलेले 45 कोटी डॉलर्सच्या पॅकेजविरोधात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला नेमक्या शब्दात फटकारले होते. पाकिस्तानला पुरविले जाणारे हे सहाय्य भारताच्या विरोधात नसल्याचा हास्यास्पद खुलासा अमेरिकेने दिली होता. पण या विमानांची क्षमता भारताला ठाऊक आहे आणि ती कुठे वापरली जाईल, याचीही सर्वांना जाणीव आहे. अवास्तव खुलासे देऊन अमेरिका भारताला मूर्ख बनवू शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला बजावले होते. यानंतरच्या काळातही अमेरिकेने भारताला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानची बाजू उचलून धरण्याचे धोरण कायम ठेवले आहे.

leave a reply