युक्रेनमधील युद्ध भडकल्यापासून अमेरिकेने भारतापेक्षा अधिक रशियन इंधनाची खरेदी केली

- युरोपिय अभ्यासगटाचा अहवाल

इंधनाची खरेदीहेलेन्स्की – युक्रेनमधील युद्धाबाबत भारताने तटस्थता सोडून द्यावी आणि रशियाविरोधात भूमिका स्वीकारावी, यासाठी अमेरिका व युरोपिय देश भारतावर दबाव टाकत आहेत. भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी बंद करावी, यासाठी अमेरिकन अधिकाऱ्याने अप्रत्यक्षपणे भारताला निर्बंधांचा इशारा दिला होता. यावर भारताच्या कितीतरी अधिक पट युरोपिय देश रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहेत, अशा स्पष्ट शब्दात भारताने अमेरिका व युरोपिय देशांचा दुटप्पीपणा उघड केला होता. युरोपमधील आघाडीच्या अभ्यासगटाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात देखील हीच बाब अधोरेखित केली. युक्रेनमधील युद्ध भडकल्यापासून, भारताला उपदेशाचे डोज पाजणाऱ्या अमेरिकेनेच भारताहून अधिक रशियन इंधनाची आयात केली आहे, असे या अभ्यासगटाने म्हटले आहे.

जगभरातील इंधनाची वाहतूक आणि वायुप्रदूषणावर अभ्यास करणाऱ्या ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअर-सीआरईए’ या फिनलँडमधील अभ्यासगटाने दोन दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये रशियातून झालेल्या इंधनाच्या निर्यातीची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. युक्रेनमधील युद्ध भडकलेले असतानाही अमेरिका व युरोपिय देश रशियाकडून इंधनाची खरेदी करीतच होते. युक्रेनवर हल्ले चढविले म्हणून रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादणारे अमेरिका व युरोप हेच रशियाकडून सर्वाधिक इंधनाची खरेदी करीत असल्याचे ‘सीआरईए’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक प्रमाणात इंधनाची खरेदी केली. तर भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी बंद करावी आणि आमच्याकडून इंधनाची आयात करावी, असा प्रस्ताव देणारा अमेरिका देखील भारताहून अधिक प्रमाणात रशियन इंधनाची खरेदी करीत असल्याचे या अहवालातून उघड झाले आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत रशियाने 66.5 अब्ज डॉलर्स इतकी इंधनाची निर्यात केली. या अहवालामुळे भारत हा रशियन इंधनावर अवलंबून असल्याचा पाश्चिमात्य देशांच्या प्रचाराच्या चिंधड्या उडाल्या आहेत.

आठवड्यापूर्वी भारत आणि अमेरिकेतील ‘टू प्लस टू’ची बैठकीच्या निमित्ताने देखील भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याला सणसणीत प्रत्युत्तर दिले होते. भारत रशियाकडून महिनाभरात जितके इंधन खरेदी करतो, त्याच्याहीपेक्षा अधिक इंधन युरोप एका दिवसाच्या आत खरेदी करतो, अशी चपराक भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावली होती. युरोपिय अभ्यासगटाच्या अहवालाद्वारे नेमकी हीच बाब अधोरेखित होत आहे.

leave a reply