अफगाणिस्तानकडे पाठ फिरवणे अमेरिकेला परवडणार नाही

- अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील संघर्ष लवकरात लवकर संपवून टाका, असे बहुतांश अमेरिकी जनतेला वाटते. मात्र त्यासाठी आपण अफगाणिस्तानकडे पाठ फिरवली तर ते अमेरिकेच्या हिताचे ठरणार नाही. कारण तसे केले तर अफगाणिस्तानातील पोकळीचा फायदा घेऊन तालिबान येथे पुन्हा आपली राजवट प्रस्थापित करील. त्यासाठी पाकिस्तान आणि चीन तालिबानला सहाय्य करतील, असा इशारा अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी दिला. त्याचबरोबर तालिबानला अफगाणिस्तानातून पिटाळून लावल्यानंतर तालिबान पाकिस्तानात संघटीत झाली, याकडे अमेरिकेचे दुर्लक्ष झाले, अशी टीका गेट्स यांनी केली आहे.

अफगाणिस्तानकडे पाठ फिरवणे अमेरिकेला परवडणार नाही - अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्सअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघार घोषित करून एक महिना झाला आहे. ११ सप्टेंबरपर्यंत ही सैन्यमाघार पूर्ण होईल. अफगाणिस्तानातील अमेरिकेची ही सैन्यमाघार सुरू झालेली असताना, तालिबानच्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. मंगळवारी तालिबानने अफगानिस्तानच्या पूर्वेकडील जलालाबाद शहरात आरोग्यसेवकांवर गोळीबार करून चार जणांचा बळी घेतला. शहरातील मुलांसाठी पल्स पोलिओचे डोस देणार्‍या आरोग्यसेवकांना तालिबानने लक्ष्य केले.

पल्स पोलिओसारख्या आरोग्यविषयक मोहिमांना तालिबानचा कडवा विरोध आहे. याशिवाय मुलींचे शिक्षण, राजकारणातील महिलांचा सहभाग याला विरोध करणार्‍या तालिबानचे अफगाणिस्तानातील मुलींच्या शाळांवरील हल्ले वाढले आहेत. तालिबानचे हल्ले वाढत असताना, अमेरिका आणि नाटो लष्कराने अफगाणिस्तानातून माघार घेऊ नये, ही मागणी जोर पकडत आहे. माात्र बायडेन प्रशासन सैन्यमाघारीच्या निर्णयावर ठाम आहे.

माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी अमेरिकेतील वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात या सैन्यमाघारीचा कडाडून विरोध केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना अफगाणिस्तानातून अमेरिकी जवानांना माघारी आणायचे आहे. पण याच्या दीर्घकालिन परिणामांचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी विचार केला नाही, अशी चिंता गेट्स यांनी व्यक्त केली.अफगाणिस्तानकडे पाठ फिरवणे अमेरिकेला परवडणार नाही - अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स

आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यास उत्सूक नसलेली तालिबान अफगाणिस्तानवर आपली राजवट प्रस्थापित करण्यासाठी चीनशी संधान साधेल. अफगाणिस्तानातील खनिजसंपत्तीवर डोळा असणारा चीन देखील तालिबानच्या राजवटीला मान्यता देऊन आर्थिक सहाय्य पुरविल. असे झाले तर चीनच्या महत्त्वकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पात अफगाणिस्तान सहभागी होईल, याकडे गेट्स यांनी लक्ष वेधले. तर २००१ साली अमेरिकेने तालिबानला अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर त्यांनी पाकिस्तानात आपला तळ ठोकला. पाकिस्तानातच तालिबान पुन्हा संघटीत झाली आणि याला पाकिस्तानच्या नेत्यांनी सहाय्य केले. पाकिस्तानचे तत्कालिन हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी तालिबानला सुरक्षित आश्रयस्थाने तयार करून दिली, असा आरोप गेट्स यांनी केला. पाकिस्तानातील तालिबानच्या या आश्रयस्थानांकडे अमेरिकेचे दुर्लक्ष झाले व इथेच अमेरिकेचे चुकले, अशी टीका माजी संरक्षणमंत्र्यांनी केली.

याआधी माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस व हिलरी क्लिंटन यांनीही अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर फेरविचार करण्याचा सल्ला बायडेन प्रशासनाला दिला होता. माजी लष्करी अधिकारी देखील या सैन्यमाघारीच्या विपरित परिणामांची जाणीव करून देत आहेत. आता माजी संरक्षणमंत्री गेट्स यांनीही याबाबत बायडेन प्रशासनाला सावधगिरीचा इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply