चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकेला चिंता – परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी ‘आसियन’च्या बैठकीत बजावले

ब्लिंकनवॉशिंग्टन – ‘गेल्या कित्येक दशकांपासून प्रतिकारापुरती अण्वस्त्रे, असे धोरण चीनच्या राजवटीने राबविले होते. पण आता मात्र चीनच्या राजवटीने त्या धोरणापासून फारकत घेतल्याचे दिसत आहे. चीन गेल्या काही वर्षात अण्वस्त्रांची संख्या वेगाने वाढवित आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘आसियन’च्या रिजनल फोरमच्या बैठकीत अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली.

गेल्या काही महिन्यात अमेरिकेने चीनविरोधातील आघाडी भक्कम करण्यासाठी आग्नेय आशियाई देशांबरोबरील संबंध मजबूत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वेंडी शरमन यांनी आग्नेय आशियाचा दौरा केला होता. त्यापाठोपाठ अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनीही आग्नेय आशियाई देशांना भेट दिली होती. या महिन्याच्या सुरुवातीला परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनीही आग्नेय आशियाई देशांशी बैठका व चर्चा सुरू केली आहे. रिजनल फोरममधील वक्तव्य त्याचाच भाग मानला जातो.

ब्लिंकनरिजनल फोरमच्या बैठकीत ब्लिंकन यांनी चीनच्या अण्वस्त्रांबरोबरच उत्तर कोरियाच्या ‘डिन्यूक्लरायझेशन’चा मुद्दाही उपस्थित केला. त्याचवेळी चीनकडून ‘साऊथ चायना सी’मध्ये सुरू असणार्‍या वाढत्या वर्चस्ववादी कारवायांकडेही ‘आसियन’ देशांचे लक्ष वेधले. ब्लिंकन यांच्या वक्तव्यांवर चीनकडूनही प्रतिक्रिया उमटली असून अमेरिकेने दुसर्‍या देशांच्या मुद्यात ढवळाढवळ करु नये, असे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावल्याचे समोर आले आहे.

ब्लिंकनचीनच्या अण्वस्त्रांबाबत गेल्या काही महिन्यात सातत्याने चिंताजनक अहवाल समोर येत आहेत. जून महिन्यात, ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सिप्री) या अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीनकडे ३५० अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात आले होते. चीन आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वेगाने वाढ करीत असून आधुनिकीकरणाची प्रक्रियाही सुरू असल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात सांगण्यात आले होते.

त्यानंतर गेल्याच महिन्यात, अमेरिकी अभ्यासगट ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस्’ने यासंदर्भातील नवा अहवाल प्रसिद्ध केला होता. यात चीनकडून झिंजिआंग प्रांताच्या पूर्व भागात अण्वस्त्रांसाठी आवश्यक असणार्‍या जवळपास ११० ‘सिलोस’ची उभारणी सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या अभ्यासगटाने चीनच्या हालचालींचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले होते. चीनने यापूर्वी उभारणी व बांधकाम सुरू असलेल्या ‘सिलोस’ची संख्या लक्षात घेता चीनकडील अण्वस्त्रांची संख्या ४०० ते ९००च्या मध्ये असल्याची शक्यता आहे, याकडे अमेरिकी अभ्यासगटाने लक्ष वेधले होते.

leave a reply