1958 साली अमेरिकेने तैवानसाठी चीनवर अणुहल्ल्याची तयारी केली होती

- अमेरिकी दैनिकाचा दावा

वॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकेने 1958 साली तैवानच्या मुद्यावरून चीनवर अणुबॉम्ब टाकण्याची योजना आखली होती, असा दावा अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने केला आहे. अमेरिकी लेखक व ‘व्हिसलब्लोअर’ डॅनिअल एल्सबर्ग यांनी ही माहिती दिल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे. गेले काही महिने चीनच्या लष्कराकडून सातत्याने तैवानवरील आक्रमणाच्या उद्देशाने युद्धसराव सुरू आहे. त्याचवेळी अमेरिका व मित्रदेशांकडूनही इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. या घटना तैवानसाठी अमेरिका-चीन संघर्ष भडकू शकतो, असे संकेत देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर 1958 सालच्या अणुहल्ल्याच्या योजनेबद्दल गौप्यस्फोट ही लक्षवेधी बाब ठरते.

1958 साली अमेरिकेने तैवानसाठी चीनवर अणुहल्ल्याची तयारी केली होती - अमेरिकी दैनिकाचा दावाचीन 1949 साली स्वतंत्र झाल्यानंतर चिनी नेते ‘चँग कै-शेक’ यांच्या नेतृत्त्वाखालील नॅशनॅलिस्ट गव्हर्मेंटने तैवानमध्ये आश्रय घेतला. या राजवटीला पराभूत करून तैवान ताब्यात घेण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून सातत्याने हल्ले चढविण्यात येत होते. 1958 साली चीनने तैवानची ‘फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘क्वेमे व मात्सु’ बेटांवर तोफांचा मारा सुरू केला. चीनचा हा हल्ला रोखण्यासाठी अमेरिकेने विविध पर्यायांवर विचार सुरू केला होता.

1958 साली अमेरिकेने तैवानसाठी चीनवर अणुहल्ल्याची तयारी केली होती - अमेरिकी दैनिकाचा दावाअमेरिकेचे तत्कालिन हवाईदलप्रमुख जनरल नॅथन ट्विनिंग व पॅसिफिक क्षेत्रातील हवाईदलाचे कमांडर जनरल लॉरेन्स एस. कुटर यांनी, चीनला रोखण्यासाठी अणुहल्ल्याची योजना मांडली होती. जनरल नॅथन ट्विनिंग यांनी, चीनच्या हवाईतळांवर 10 ते 15 किलोटन वजनाच्या अणुबॉम्बचा मारा करावा, असे सुचविलेही होते. त्यानेही चीन बधला नाही तर शांघायपर्यंतच्या विविध शहरांवर अणुहल्ले चढविण्याची जनरल ट्विनिंग यांची योजना होती. अमेरिकेच्या या भयंकर डावपेचांचे संकेत मिळाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात चिनी लष्कराने हल्ले थांबवून तैवानबरोबर संघर्षबंदी केली.

1958 साली अमेरिकेने तैवानसाठी चीनवर अणुहल्ल्याची तयारी केली होती - अमेरिकी दैनिकाचा दावाअमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ड्वीट आयसेनहॉवर चीनवर अणुहल्ल्याचा निर्णयाला अनुकूल नव्हते. अमेरिकेने चीनवर हल्ला चढविल्यास ‘सोव्हिएत रशिया’ चीनची बाजू घेऊन अमेरिकी तळांवर अणुहल्ले चढविल, अशी भीती राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर व व्हाईट हाऊसमधील काही सल्लागारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे काही काळाकरता अणुहल्ल्याचा प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला, असे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

सध्या अमेरिका व चीनमध्ये जबरदस्त तणाव असून तैवान हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2019 साली एका कार्यक्रमात उघडपणे तैवान ताब्यात घेण्यासाठी सर्व पर्याय वापरले जातील, असा इशारा दिला होता. त्यानंतर चीनच्या संरक्षणलांनी तैवानच्या क्षेत्रातील हालचाली वाढविल्या असून चिनी युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत घुसखोरी करीत आहेत. तसेच तैवाननजिक असलेल्या आपल्या संरक्षणतळावरील तैनातीही चीनकडून वाढविण्यात आली आहे. दुसर्‍या बाजूला अमेरिकेनेही मित्रदेशांसह या भागातील लष्करी वावर वाढवून याबाबत चीनला स्पष्ट इशारा दिला आहे.

leave a reply