पर्शियन आखातातील पॅट्रियॉट यंत्रणा अमेरिका रशिया-चीनच्या विरोधात तैनात करणार

पॅट्रियॉटवॉशिंग्टन – सौदी अरेबिया आणि आखाती अरब मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा अमेरिकेने काढून घेतल्या आहेत. येत्या काळात अमेरिकेचे लष्कर देखील माघारी घेणार आहे. पर्शियन आखातातून माघारी घेण्यात येणार्‍या पॅट्रियॉट यंत्रणा व इतर शस्त्रास्त्रे अमेरिका येत्या काळात रशिया आणि चीनच्या विरोधात तैनात करील, असा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तसा इशारा दिला होता, याची आठवण या अमेरिकी वर्तमानपत्राने करून दिली.

पर्शियन आखातातून सैन्यकपात करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पेंटॅगॉनला दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, पेंटॅगॉनने सौदी अरेबियातून तीन पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणा हलविल्या आहेत. यामध्ये प्रिन्स सुल्तान हवाईतळावरील पॅट्रियॉट या हवाई सुरक्षा यंत्रणेचा समावेश आहे. तर पर्शियन आखातात तैनात असलेली अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका तसेच हेरगिरी यंत्रणाही अमेरिकेने माघारी घेतल्याची बातमी ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकी वर्तमानपत्राने दिली.

याशिवाय पेंटॅगॉन ‘थाड’ क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रभेदी बॅटरीज् देखील काढण्यावर विचार करीत आहे. शस्त्रसाहित्यांबरोबर पेंटॅगॉन पर्शियन आखातात तैनात असलेल्या आपल्या जवानांच्या संख्येतही कपात करणार असल्याचे बोलले जाते. या वर्षाच्या

पॅट्रियॉट

सुरुवातीला या ठिकाणी ९० हजार जवान तैनात होते. इराणबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्शियन आखातातील अमेरिकी जवानांची तैनाती वाढविली होती.

सध्या या क्षेत्रात अमेरिकेचे ५० हजार जवान तैनात आहेत. यात कपात करण्यात येईल, असे सदर वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या सत्तेवर आल्यास, आखाती क्षेत्रातील अमेरिकेची सैन्यतैनाती कमी करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी याआधी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, बायडेन प्रशासन ही कपात करीत असल्याचे अमेरिकी वर्तमानपत्र लक्षात आणून देत आहे.

पण या सैन्यकपातीमुळे, सौदी व अरब मित्रदेशांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला जातो. मात्र सौदीच्या सुरक्षेबाबत अमेरिकेच्या भूमिकेत बदल होणार पॅट्रियॉटनसल्याचे पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. तसेच यापुढे सौदीने स्वसंरक्षणाची जबाबदारी उचलावी, अशी अपेक्षा पेंटॅगॉन व्यक्त करीत आहे. यासाठी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय सौदीमध्ये ‘टायगर टिम’चे पथक तैनात करणार असल्याचे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे.

तर रशिया आणि चीनपासून वाढलेला धोका लक्षात घेता, बायडेन प्रशासन पर्शियन आखातातून मागे घेतलेल्या शस्त्रसाहित्यांची तैनाती येत्या काळात या देशांविरोधात करू शकते, असे अमेरिकी वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी या बातमीवर प्रतिक्रिया देताना, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी इंडो-पॅसिफिकचा पहिला दौरा केला, याकडे लक्ष वेधले.

दरम्यान, अमेरिका पर्शियन आखातातून माघार घेत असताना, फ्रान्सची विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स दी गॉल’ दोन दिवसांपूर्वीच आपल्या युद्धनौकांच्या ताफ्यासह या क्षेत्रात दाखल झाली. अमेरिकी युद्धनौकेच्या अनुपस्थितीत यापुढे फ्रेंच युद्धनौकेकडे पर्शियन आखातातील नौदलाची कमांड असेल. पुढील काही आठवडे ही तैनाती कायम असेल, अशी माहिती समोर येत आहे.

leave a reply