अमेरिका-ग्रीस लष्करी सहकार्य वाढविणार

वॉशिंग्टन/अथेन्स – अमेरिकेने ग्रीसबरोबरचे लष्करी सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अमेरिका ग्रीसमधील आपल्या लष्करी तळांच्या संख्येत वाढ करील. तर ग्रीस देखील अमेरिकेकडून चार नव्या विनाशिका खरेदी करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, तुर्कीपासून ग्रीसला असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका ग्रीसबरोबरचे लष्करी सहकार्य वाढवित असल्याचा दावा केला जातो. पण ग्रीसमधील आपल्या लष्करी तळांची संख्या वाढवून अमेरिका ब्लॅक सीमधील रशियाच्या तैनातीला उत्तर देत असल्याचे दिसत आहे.

अमेरिका-ग्रीस लष्करी सहकार्य वाढविणारअमेरिकेचे ग्रीसमध्ये पाच लष्करी तळ आहेत. यामध्ये सौदा तसेच क्रेटे बेटावरील नौदलाच्या तर लारिसा आणि स्टेफानोविकीयो येथील हवाईतळांचा समावेश आहे. यापैकी क्रेटे बेटावरील अमेरिकेचे नौदल तळ गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता. ग्रीसबरोबरचे लष्करी सहकार्य वाढविण्याच्या तयारीत असलेला अमेरिका या देशात आणखी चार नवे तळ उघडणार असल्याचा दावा केला जातो. ग्रीसने यासाठी 22 ठिकाणांचा पर्याय अमेरिकेला दिला आहे.

यामध्ये पश्‍चिम ग्रीसमधील अँड्राविदा येथील हवाईतळाचा समावेश आहे. अमेरिकेने ग्रीसबरोबरच्या हवाई सरावासाठी या तळाचा वापर केला होता. याशिवाय स्कायरोस बेटावरील तळाचाही समावेश आहे. या तळावरील तैनाती अमेरिकेला एजिअन समुद्रात महत्त्वाची आघाडी मिळवून देऊ शकते, असा दावा केला जातो. त्यामुळे अमेरिका या दोन्ही तळांचा विचार करू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच ग्रीस अमेरिकेकडून चार नव्या विनाशिकांची खरेदी करणार आहे. यामध्ये 30 सागरी मैल वेगाने प्रवास करणार्‍या आणि जवळपास पाच हजार सागरी मैल अंतर गाठू शकणार्‍या विनाशिकांची मागणी ग्रीस करणार आहे. ग्रीसचे सरकार अमेरिकेच्या नौदलातील फ्रिडम श्रेणीतील ‘लिटरोल’ ही अतिप्रगत विनाशिका खरेदी करणार असल्याचा दावा ग्रीसमधील माध्यमे करीत आहेत. अमेरिका किंवा ग्रीसच्या सरकारने याविषयी अधिकृत स्तरावर कोणतीही घोषणा केलेली नाही.अमेरिका-ग्रीस लष्करी सहकार्य वाढविणार

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये तुर्कीने ग्रीस, सायप्रस या युरोपिय तसेच नाटोचे सदस्य असलेल्या देशांच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. तुर्की देखील नाटोचा सदस्यदेश आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये तुर्कीच्या हालचालींचा अमेरिका तसेच ब्रिटन, फ्रान्स या देशांनी देखील विरोध केला होता. अमेरिकेने ग्रीसबरोबर संयुक्त सागरी सरावातही सहभाग घेऊन तुर्कीला समज दिली होती.

काही आठवड्यांपूर्वी ग्रीसमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या विनाशिकांनी तुर्कीचे बॉस्फोरसचे आखात ओलांडले होते. त्यामुळे अमेरिका व ग्रीसमधील लष्करी सहकार्य तुर्कीच्या विरोधात असल्याचा दावा ग्रीसची माध्यमे करीत आहेत. असे असले तरी, अमेरिका ग्रीसमध्ये नव्या लष्करी तळांची निर्मिती करून रशियाविरोधात हालचाल करीत असल्याचे लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. ब्लॅक सी, युक्रेनच्या सीमेजवळ रशियाने केलेल्या तैनातीच्या विरोधात अमेरिका ग्रीसमध्ये आपली तैनाती वाढवित आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेने ग्रीसमध्ये एफ-15, एफ-16, केसी-135 टँकर विमाने आणि ‘एमक्यू-9 रिपर ड्रोन’ची तैनाती वाढविली आहे.

leave a reply