सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या पाकिस्तानच्या सहा कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले

PAKISTAN-UNREST-DEFENCE-PARADEवॉशिंग्टन – पाकिस्तानच्या सहा कंपन्या आण्विक आणि क्षेपणास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात अतिशय धोकादायक व्यवहार करीत आहेत. येत्या काळात या पाकिस्तानी कंपन्यांमुळे अमेरिकेची सुरक्षा देखील धोक्यात सापडू शकते, असा आरोप करून अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले. पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या ताब्यात जाऊ शकतात, असा इशारा अमेरिकेकडून सातत्याने दिला जात आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेने पाकिस्तानवर केलेली कारवाई महत्त्वाची ठरते.

अमेरिकेच्या कोषागार विभागाने गुरुवारी एकूण 24 कंपन्यांवर निर्बंधांची कारवाई केली. यामध्ये पाकिस्तानातील सहा कंपन्यांचा समावेश आहे. डायनॅमिक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन, एनरक्विप प्रायव्हेट लिमिटेड, एनएआर टेक्नॉलॉजीस्‌‍ जनरल ट्रेडिंग एलसीसी, ट्रोजन्स, रेन्बो सोल्युशन्स आणि युनिव्हर्सल ड्रिलिंग इंजिनिअर्स अशा या कंपन्यांची नावे आहेत. पाकिस्तानच्या या कंपन्या सातत्याने क्षेपणास्त्र आणि आण्विक तंत्रज्ञानासंबंधी धोकादायक व्यवहार करीत असल्याचा आरोप अमेरिकेच्या कोषागार विभागातील उपमंत्री थी रॉझ्मन केंडलर यांनी केला.

thea rozman kindlerक्षेपणास्त्र व आण्विक तंत्रज्ञानाबाबतचे व्यवहार चुकीच्या संघटनांशी केल्यास अमेरिकेला त्याचा धोका संभवू शकतो. याचे जागतिक स्तरावर देखील पडसाद उमटू शकतात, असा ठपका ठेवून केंडलर यांनी पाकिस्तानी कंपन्यांवरील निर्बंधांचे समर्थन केले. यापैकी डायनॅमिक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन कंपनी अतिशय धोकादायकरित्या आण्विक तंत्रज्ञानाचा प्रसार करीत असल्याची शक्यता अमेरिकन यंत्रणांनी वर्तविली. या कंपन्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र आणि आण्विक कार्यक्रमाशी जोडलेल्या असल्याचा दावा केला जातो.

अण्वस्त्रसज्ज असलेला पाकिस्तान अधिकाधिक असुरक्षित बनत चालला आहे. या देशामध्ये अस्थैर्य वाढत असून दहशतवादी संघटनांच्या कारवाया या अस्थैर्यामागील मुख्य कारण ठरत आहेत. या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचे समर्थन मिळत असल्याचा आरोप अमेरिकेने याआधी केला होता. पाकिस्तानातील या घडामोडींवर वेळीच लक्ष पुरविले नाही तर या देशाची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या ताब्यात जातील, असा इशारा अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला होता.

leave a reply