अमेरिका व भारत एकजुटीने अदृश्य शत्रूचा पराभव करतील – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – ‘कोरोना साथीविरोधातील संघर्षासाठी अमेरिका मित्रदेश असलेल्या भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या कठीण काळात आम्ही भारतासोबत ठामपणे उभे असून कोरोनाची लस विकसित करण्यासाठीही अमेरिका व भारतामध्ये सहकार्य सुरू आहे. आम्ही एकजुटीने अदृश्य शत्रूचा पराभव करु’, अशी निःसंदिग्ध ग्वाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचे भारताच्या पंतप्रधानांनी स्वागत केले आहे.

चीनमधून सुरु झालेल्या कोरोनव्हायरस साथीचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. त्यामुळे अमेरिकी नेतृत्वाने सर्वच पातळ्यांवर चीनविरोधात आघाडी उघडली असून त्यासाठी मित्रदेशांकडूनही सहकार्य घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका यात सातत्याने भारताबरोबरील सहकार्याचा दाखला देत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताबाबत काढलेले उद्गार ही बाब नव्याने अधोरेखित करीत आहेत.

अमेरिकेत साथीचा फैलाव वाढल्यानंतर ट्रम्प यांनी भारताकडे साथीवर प्रभावी ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाची मागणी केली होती. भारताने अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर या औषधांचा पुरवठा केला होता. त्यापाठोपाठ कोरोनावरील लस विकसित करण्यासाठीही अमेरिकेने भारतीय कंपन्यांचे सहकार्य घेतले होते. काही दिवसांपूर्वीच, कोरोनाव्हायरसची साथ रोखणारी लस विकसित करण्यासाठी भारत व अमेरिकन कंपन्यांमध्ये सहकार्य सुरू असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती, अमेरिकेतील भारताच्या राजदूतांनी दिली होती.

नुकतेच भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी कोरोनाव्हायरसची निर्मिती प्रयोगशाळेत झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यांचा हा दावा अमेरिकेच्या भूमिकेचे समर्थन करणारा असल्याचे भारतीय माध्यमांनी लक्षात आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताबरोबरील वाढत्या सहकार्याबाबत केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अदृश्य शत्रूच्या पराभवाबाबत काढलेले उद्गारही लक्षवेधी ठरतात.

भारताच्या पंतप्रधानांनीही ट्रम्प यांच्या सहकार्याच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला आहे. ‘या साथीच्या संकटाविरोधात आपण सर्व एकजुटीने लढत आहोत. अशा काळात देशांनी एकत्र येऊन जगाला कोरोनापासून मुक्त करणे व अधिक आरोग्यसंपन्न बनवणे महत्त्वाचे आहे’, अशी प्रतिक्रिया देऊन पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले आहेत.

leave a reply