आखाती क्षेत्रातील अमेरिकेचा प्रभाव ओसरत आहे

- सिरियन राष्ट्राध्यक्षांच्या अरब लीगमधील स्वागतानंतर विश्लेषकांचा निष्कर्ष

जेद्दाह – सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये अरब लीगची बैठक सुरू झाली आहे. तब्बल १२ वर्षांनंतर सिरिया या बैठकीत सहभागी होत आहे, याकडे आखाती क्षेत्रातील माध्यमांसह जगभरातील माध्यमसृष्टी लक्ष वेधत आहे. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बाशर अल-अस्साद यांचे अरब लीगमध्ये झालेले स्वागत म्हणजे अमेरिकेचा राजनैतिक पराभव असल्याचे दावे केले जातात. अमेरिकेचा आखाती क्षेत्रावरील प्रभाव ओसरल्याचे सिरियन राष्ट्राध्यक्षांची जेद्दाहमधील अरब लीगच्या बैठकीतील उपस्थितीत दाखवून देत असल्याची चर्चा सुरू आहे.

आखाती क्षेत्रातील अमेरिकेचा प्रभाव ओसरत आहे - सिरियन राष्ट्राध्यक्षांच्या अरब लीगमधील स्वागतानंतर विश्लेषकांचा निष्कर्षसिरियामध्ये २०११ बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या राजवटीला आव्हान देऊन सशस्त्र लढा पुकारला. सिरियाचा निकटतम मित्रदेश असलेल्या इराणने व रशियाने राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची बाजू उचलून धरली. तर सौदी अरेबिया, युएई या देशांनी सिरियन जनतेने राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्याविरोधात उठाव केल्याचे म्हटले होते. सिरियन बंडखोरांच्या मागे अमेरिका व आखाती देशांचे पाठबळ उभे असल्याचे अनेकवर उघड झाले होते. यानंतर सौदीसह अरब लीगमधील प्रमुख देशांनी सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची राजवट सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करीत असल्याचा ठपका ठेवला होता. यानंतर सिरियाचे अरब लीगमधील सदस्यत्त्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याला १२ वर्ष उलटल्यानंतर, सिरिया पुन्हा एकदा अरब लीगमध्ये सहभागी झाला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला मिळालेले हे फार मोठे अपयश असल्याचे दिसते. अमेरिकेने यावर टीका देखील केली होती. अरब लीगने सिरियाबाबत निर्णय घेताना अधिक विचार करावा, अशी मागणी अमेरिकेने केली होती. पण त्याकडे अरब लीगने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. यावर बोट ठेवून इराणसारखा देश अमेरिकेचा आखाती क्षेत्रातील प्रभाव ओसरत असल्याचे दावे करीत आहे.

अमेरिकेच्या विरोधी पक्षांनी तसेच विश्लेषकांनी देखील बायडेन प्रशासनाने आखाती क्षेत्राबाबत स्वीकारलेल्या धोरणांचे दुष्परिणाम समोर येतील, असा इशारा याआधीच दिला होता. त्यांचा हा इशारा प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसत आहे. बायडेन प्रशासनाने आखाती क्षेत्रातील आपल्या इस्रायल व सौदी अरेबिया या प्रमुख सहकारी देशांना दुखावण्याची घोडचूक केली. त्याचे परिणाम अमेरिकेला सहन करावे लागत आहेत, अशी टीका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच केली होती.

आखाती क्षेत्रातील अमेरिकेचा प्रभाव ओसरत आहे - सिरियन राष्ट्राध्यक्षांच्या अरब लीगमधील स्वागतानंतर विश्लेषकांचा निष्कर्षदरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अरब लीगला पत्र पाठवून सहकार्याचा प्रस्ताव दिला आहे. आखाती क्षेत्रात सुरू असलेल्या इस्रायल-पॅलेस्टाईन वाद तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी रशिया पुढाकार घेऊ शकेल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुचविले. यामध्ये सुदान, लिबिया व येमेन या देशांमध्ये सुरू असलेला रक्तपात थांबविण्यासाठी रशिया योगदान देऊ शकेल, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. तर अरब लीगच्या जेद्दाहमधील या बैठकीला उपस्थित असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी अरब लीगने युक्रेनकडे दुर्लक्ष करू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, अरब लीगने अमेरिका आणि युरोपिय देशांच्या सूचनेनुसार युक्रेनची बाजू घेण्यास नकार दिला होता. या युद्धात अरब लीगच्या सदस्यदेशांनी तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली होती. सौदी व इतर इंधनउत्पादक देशांनी इंधनाच्या उत्पादनात वाढ करण्याची अमेरिकेने केलेली मागणीही धुडकावलेली आहे. त्यामुळे अरब लीगच्या या बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळालेली असली, तरी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अरब लीग रशियाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

हिंदी English

 

leave a reply