वर्षभरात अमेरिकेतील व्याजदर पाच टक्क्यांवर जाण्याचे संकेत

फेडरल रिझर्व्ह व ‘बँक ऑफ इंग्लंड’कडून अर्ध्या टक्क्यांची वाढ

US interest ratesवॉशिंग्टन/लंडन – अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी २०२३ सालच्या अखेरपर्यंत अमेरिकेतील व्याजदर पाच टक्क्यांवर जाऊ शकतात, असेही बजावले.फेडरल रिझर्व्हच्या घोषणेनंतर ‘बँक ऑफ इंग्लंड’नेही ०.५० टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या घोषणांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व आशियातील शेअरबाजारांसह इंधनाच्या दरांमध्येही घसरण झालीआहे.

stocks downगेल्या काही महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीसदृश वातावरण असून त्यासाठी जगातील प्रमुख देशांकडून व्याजदरात केली जाणारी वाढ हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. अमेरिका, युरोप व इतर आघाडीच्या देशांनी महागाईचा भडका रोखण्याचे कारण पुढे करून व्याजदरातील वाढीचे सातत्याने समर्थन केले आहे. बुधवारी फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आलेल्या घोषणेतही जेरोम पॉवेल यांनी याचीच पुनरावृत्ती केली. पॉवेल यांनी, उत्पादन तसेच सेवाक्षेत्रातील अनेक घटकांच्या दरात होणारी वाढ ही अजूनही समस्या असून त्यासाठी व्याजदरातील वाढ हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.

बुधवारच्या घोषणेनंतर अमेरिकेतील व्याजदर ४.५ टक्के झाला आहे. हा गेल्या १५ वर्षातील अमेरिकेतील सर्वाधिक व्याजदर ठरतो. अर्ध्या टक्क्यांची नवी वाढ ही गेल्या नऊ महिन्यांमधील सातवी दरवाढ ठरली आहे. पुढील वर्षातही ही दरवाढ कायम राहिल मात्र वाढीचे प्रमाण कमी असेल, असे संकेत जेरोम पॉवेल यांनी दिले. २०२३ सालच्या अखेरपर्यंत अमेरिकेतील व्याजदर ५.१ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतात व त्यानंतर २०२४ व २०२५ सालात त्यात घट करण्यात येईल, असे पॉवेल यांनी स्पष्ट केले. महागाई कमी होत आहे याचे ठोस पुरावे समोर आल्याशिवाय व्याजदरात घट होणार नाही, असेही फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी बजावले.

powellफेडरल रिझर्व्हच्या घोषणेनंतर काही तासातच ब्रिटनच्या मथ्यवर्ती बँकेनेही व्याजदरात वाढीची घोषणा केली. ‘बँक ऑफ इंग्लंड’नेही व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढविले असून नवा दर ३.५ टक्के असणार आहे. हा ब्रिटनमधील गेल्या १४ वर्षातील उच्चांकी व्याजदर ठरतो. ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेकडून सलग नवव्यांदा दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये महागाई दर गेल्या ४० वर्षातील सर्वाधिक स्तरावर असून अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनमधील जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्याजदरातील वाढीमुळे घरासह इतर अनेक घटकांवरील व्याजाच्या दरांमध्ये भर पडून सामान्य नागरिकांसमोरील अडचणींमध्ये वाढ होईल, अशी चिंता विश्लेषकांनी व्यक्त केली.

अमेरिका व ब्रिटनने जाहीर केलेल्या व्याजदरवाढीचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उमटले. अमेरिका तसेच आशियातील आघाडीच्या शेअर निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. कच्चे तेल व सोन्याचे दरही खाली आले असून येन, युरोसह काही प्रमुख चलनांचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरले आहे.

हिंदी English

leave a reply