अमेरिका म्हणजे ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’

- इराणचा ठपका

तेहरान – ‘‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ अर्थात कॅरेबियनमधील चाचे जाहीरपणे आपण केलेल्या लुटीची बढाई मारत आहेत. इतर कुठलाही सुसंस्कृत देश चोरी करून अशारितीने त्याच्या बढाया मारू शकत नाही’, अशी जळजळीत टीका इराणने अमेरिकेवर केली. इराणची चार इंधनवाहू जहाजे ताब्यात घेऊन त्यातील इंधनाची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केल्याची घोषणा अमेरिकेने केली होती. त्यावर इराणची ही प्रतिक्रिया उमटली आहे.

अमेरिका म्हणजे ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ - इराणचा ठपकागेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणच्या इंधनाशी संबंधित ११ कंपन्यांवर नवे निर्बंध घोषित केले. या निर्बंधांबरोबरच इराणच्या इंधनवाहू जहाजांवर केलेल्या कारवाईची माहिती जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेचे निर्बंध धुडकावून व्हेनेझुएलाला इंधनवाहू जहाजे रवाना करणार्‍या इराणवर अमेरिकेने कारवाई केली होती. या कारवाईत अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी इराणची इंधनवाहू जहाजे जप्त केल्याची माहिती अमेरिकन अधिकार्‍याने दिली. या इंधनवाहू जहाजांमध्ये तब्बल ११ लाख बॅरेल्स इंधनाचा साठा होता. पुढे या जहाजांमधील इंधनाची आंतरराष्ट्रीय बाजारात चार कोटी डॉलर्सला विक्री करुन त्याचा वापर दहशतवादाचे बळी ठरलेल्या पीडितांच्या कुटुंबियांसाठी करण्यात आला, असे अमेरिकी अधिकार्‍याने स्पष्ट केले.

अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसशी संबंधित या जहाजांवर केलेली कारवाई योग्यच असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कारवाईवर टीका केली असून अमेरिकेने सागरी लुटारुप्रमाणे आपल्या दरोड्याच्या बढाया मारल्या आहेत, असा ठपका इराणने ठेवला. अमेरिका ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ असल्याचा टोला इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे. त्याचबरोबर अमेरिकेने इराणवर ठेवलेले आरोप बिनबुडाचे असल्याचेही इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply