भारत-चीन संबंध तणावपूर्ण बनले आहेत

-परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – भारत आणि चीनचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करायचे असेल तर उभय देशांमध्ये झालेल्या सीमाव्यवस्थापनांबाबतच्या करारांचे संपूर्ण पालन करावे लागेल, असे जयशंकर पुढे म्हणाले. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तापमान शुन्यावर पोहोचले असून चीनचे जवान इथे जवळपास गोठलेल्या स्थितीत आहेत. अशा काळात भारताचे परराष्ट्रमंत्री राजनैतिक भाषेत चीनला संपूर्ण माघार घेतल्याखेरीज भारताबरोबरील संबंध सुधारणे शक्य नसल्याचा संदेश देत आहेत.

तणावपूर्ण

लडाखमधील तापमान शुन्यापर्यंत पोहोचले असून ‘एलएसी’वरील चीनच्या जवानांची अवस्था बिकट बनली आहे. यामुळे वारंवार चीन भारताला पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडून माघार घेण्याचा प्रस्ताव देत आहे. पण या क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्‍न करणारे चीननेच आपले लष्कर मागे घ्यावे, ही भारताची प्रमुख मागणी आहे. त्यानंतरच भारत आपले सैन्य माघारी घेण्यावर विचार करील, असे सीमावादावरील चर्चेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावेळी चीनला कुठल्याही प्रकारची सवलत देण्यास भारत तयार नसल्याचे दिसते. चीनच्या तोडीस तोड लष्करी तैनाती करुन भारत चीनच्या दबावाला त्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहे. यामुळे कोंडी झालेला चीन आपल्या सरकारी मुखपत्रामार्फत भारताला नवनवीन धमक्या देत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या भारत व अमेरिकेमधील २+२ चर्चेमुळे चीन अधिकच अस्वस्थ झाला आहे. भारत व अमेरिकेतील ‘बेका’ करारामुळे चीनने लडाखच्या सीमावादावरील चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र ही चर्चा व वाटाघाटी टाळण्याचे गंभीर परिणाम चीनलाच अधिक प्रमाणात सहन करावे लागतील, असे स्पष्टपणे दिसत आहे. विशेषत: लडाखच्या ‘एलएसी’वर शुन्यापर्यंत तापमान आलेले असताना, या वातावरणाची सवय नसलेल्या चिनी जवानांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच भारतीय नौदलाचे ‘मार्कोस’ कमांडो पथक लडाखमध्ये तैनात केल्याचे वृत्त आहे. यामुळे पँगाँग त्सो सरोवराच्या क्षेत्रात कारवाईची तयारी भारताने केल्याचे संकेत मिळत आहेत.

भारताची आक्रमकता पाहता, चीन जितका काळ ‘एलएसी’वरील आपले सैन्य माघारी घेणार नाही, तितक्याच अधिक प्रमाणात चीनला नुकसान सहन करावे लागेल, असे दिसत आहे. जगभरातील लष्करी विश्लेषक या सीमावादात भारत चीनला जबरदस्त टक्कर देत असल्याचा निष्कर्ष नोंदवित आहेत. चीनला हा सीमावाद सोडवून भारताबरोबरील संबंध पूर्ववत करायचे असल्यास लडाखच्या ‘एलएसी’वरुन माघार घ्यावीच लागेल. इतकेच नाही तर पुढच्या काळात इथल्या सीमेवरील गस्त आणि तैनातीबाबत दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांचे पालन करणे अनिवार्य आहे, याचीही जाणीव चीनला भारताकडून करुन दिली जात आहे. लडाखच्या ‘एलएसी’वरीलच नाही तर सागरी क्षेत्रातही चिनी नौदलाची अरेरावी सहन केली जाणार नाही, असाही संदेश भारतीय नौदलांच्या हालचालींद्वारे चीनला दिला जात आहे.

leave a reply