अमेरिकेकडून युरोपिय देशांमध्ये प्रगत अण्वस्त्रे तैनात करण्याच्या हालचाली

advanced nuclear weaponsवॉशिंग्टन – रशियाकडून अणुहल्ल्वाबाबत करण्यात येणाऱ्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युरोपिय देशांमध्ये प्रगत अण्वस्त्रे तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेने विकसित केलेले ‘बी-६१ ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब्स’ येत्या दोन महिन्यात युरोपिय देशांमध्ये तैनात करण्यात येतील, अशी माहिती ‘पॉलिटिको’ या वेबसाईटने दिली आहे. अमेरिकेने युरोपातील सहा देशांमधील तळांवर अण्वस्त्रे ठेवली असून या सर्व तळांवर नवे अणुबॉम्ब धाडण्यात येतील, असे अमेरिकी वेबसाईटने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी युरोपात नाटोच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत अमेरिकेने नव्या प्रगत अणुबॉम्ब्सच्या तैनातीचा मुद्दा उपस्थित केला. रशियाकडून अणुहल्ला होण्याची शक्यता वाढल्याचे सांगून नव्या तैनातीचे समर्थन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नाटोने कोणत्याही परिस्थितीत रशियाकडून देण्यात येणाऱ्या आण्विक धमक्यांना न घाबरता सज्जता ठेवली पाहिजे, अशी आग्रही मागणी बैठकीतील काही देशांनी केल्याचेही समोर आले आहे.

nuclear weaponsनाटो आघाडीत अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन व फ्रान्स या देशांकडे अण्वस्त्रे आहेत. मात्र ही अण्वस्त्रे अमेरिकेकडे असलेल्या ‘बी-६१ ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब्स’प्रमाणे प्रगत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अमेरिकेने युरोपातील आण्विक तळांवर येत्या दोन महिन्यात नवी अण्वस्त्रे तैनात करण्याचा निर्णय घेतल्याचे वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या न्यूक्लिअर फोर्सेसना अलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अणुहल्ल्यांबाबत देत असलेली धमकी पोकळ नसल्यताचेही पुतिन यांनी बजावले होते. रशियातील माजी अधिकारी व विश्लेषकांनी रशियन अण्वस्त्रांमध्ये युरोप उद्ध्वस्त करण्याची क्षमता असल्याची वक्तव्येही केली होती. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाकडून होणाऱ्या ड्रोनहल्ल्यांची तीव्रता वाढल्याचा दावा केला. गेल्या दोन दिवसात रशियाने ३० ड्रोन हल्ले केल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला.

leave a reply