रशिया-युक्रेन संघर्षबंदीसाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा

वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेनने युद्ध थांबविण्यासाठी रशियाशी चर्चा करावी, यासाठी अमेरिका दबाव टाकू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्याला नकार दिला. यानंतर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केल्याचे दिसत आहे. रशियाकडून दिल्या जात असलेल्या अणुयुद्धाच्या धमक्या किंवा अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल, या चर्चेमागे असल्याचे दावे केले जातात. या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षाची वाताहत होऊन संसदेत रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित होईल, अशी दाट शक्यता आहे. तसे झाले तर अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात येणारे सारे सहाय्य रोखण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी दिला होता. युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी बायडेन प्रशासनाने एकाएकी घेतलेल्या पुढाकारामागे ही पार्श्वभूमी आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने दिले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार असलेले युरी उशाकोव्ह व ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह यांच्याशी सुलिवन यांनी चर्चा केल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा भडका उडण्यापासून रोखणे व रशियाबरोबरील संवाद कायम ठेवणे या उद्देशाने ही बोलणी झाल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात नमूद करण्यात आले.

बायडेन प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्यासह अनेक अधिकारी रशियाला गंभीर परिणामांचे इशारेही देत आहेत. या पार्श्वभूमीवर सुलिवन यांनी रशियाबरोबरील चर्चेचा मार्ग खुला ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याचा दावा प्रशासनातील सूत्रांनी केला. गेल्या आठवड्यात युक्रेनला दिलेल्या भेटीतही सुलिवन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना संघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्याबाबत आवाहन केल्याचे अमेरिकी दैनिकाच्या वृत्तात सांगण्यात आले आहे. थेट शांतीचर्चा सुरू करायची नसली तरी किमान संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे संकेत आंतरराष्ट्रीय समुदायासमोर जायला हवेत, अशी भूमिका सुलिवन यांनी मांडल्याचाही दावा करण्यात येत आहे.

अमेरिकेकडून सुरू असलेल्या चर्चेच्या प्रयत्नांवर प्रतिक्रिया देण्यास रशियाने सध्या नकार दिला आहे. ‘अमेरिकी दैनिकाच्या वृत्ताबाबत रशियाला काहीही बोलायचे नाही’, असे रशिया सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सांगितले. दरम्यान, बायडेन प्रशासनाकडून चाललेल्या प्रयत्नांमागे अणुहल्ल्याच्या वाढत्या धोक्याबरोबरच अमेरिकी संसदेत होणारा संभाव्य सत्ताबदल हेदेखील एक कारण असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीनंतर संसदेत रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असेल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. तसे झाल्यास युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारे सहाय्य थांबण्याची शक्यता आहे. असे झाल्यास युक्रेनकडून रशियाविरोधात सुरू असणाऱ्या हल्ल्यांना खीळ बसू शकते. त्याचवेळी युक्रेनला रशियाविरोधात माघार घ्यावी लागण्याचीही शक्यता आहे.

leave a reply