अमेरिका पॅलेस्टिनींसाठी जेरूसलेममधले उच्चायुक्तालय पुन्हा सुरू करणार

रामल्ला – जेरूसलेममधील पॅलेस्टिनींसाठीचे उच्चायुक्तालय पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन याबाबतचा निर्णय घेऊ शकतात, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याबरोबर झालेल्या भेटीत स्पष्ट केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या परवानगीनंतर हा निर्णय होईल, असेही ब्लिंकन पुढे म्हणाले.

अमेरिका पॅलेस्टिनींसाठी जेरूसलेममध्ये पुन्हा उच्चायुक्तालय सुरू करणारअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आखाती देशांच्या दौर्‍यावर आहेत. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी मंगळवारी इस्रायलनंतर वेस्ट बँकचा दौरा करून पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांची भेट घेतली. या भेटीत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पॅलेस्टिनींसाठी लवकरच लाखो डॉलर्सचे सहाय्य रवाना करणार असल्याची माहिती दिली. तसेच जेरूसलेममधील पॅलेस्टिनींचे उच्चायुक्तालय नव्याने सुरू करण्यात येईल, असेही ब्लिंकन म्हणाले. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष आणि फताह पक्षाचे प्रमुख महमूद अब्बास यांनी ब्लिंकन यांच्या या घोषणेचे स्वागत केले.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी जेरूसलेममध्ये पॅलेस्टिनींचे पुन्हा उच्चायुक्तालय सुरू करणे राजकीय आघाडीवर तितकेसे सोपे नसल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. कारण यासाठी इस्रायलची सहमती आवश्यक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी हा निर्णय घेतला तरी अमेरिकेतच त्याला कायदेशीर पातळीवर विरोध होईल, याकडे माध्यमे लक्ष वेधत आहेत.

2019 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेचा तेल अविवमधील दूतावास जेरूसलेममध्ये हलविला होता. या निर्णयाद्वारे जेरूसलेमवरील इस्रायलचा अधिकार ट्रम्प यांनी मान्य केला होता. त्यांच्या या निर्णयाचे फार मोठे पडसाद उमटले होते.

leave a reply