सेऊल – उत्तर कोरियाने दिलेल्या भीषण प्रत्युत्तराच्या धमकीनंतरही अमेरिका व दक्षिण कोरिया युद्धसराव सुरू ठेवणार आहे. उत्तर कोरियाच्या धमकीला घाबरुन सर्वात मोठा वार्षिक युद्धसरावांमधून माघार घेणार नसल्याची घोषणा अमेरिका व दक्षिण कोरियाने केली. उत्तर कोरियाच्या चिथावणीविरोधात सज्जता ठेवण्यासाठी सदर युद्धसराव महत्त्वाचे ठरतील, असा दावा दक्षिण कोरियाने केला.
अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करी प्रवक्त्यांनी शुक्रवारी संयुक्त निवेदन जाहीर केले. यामध्ये दोन्ही देशांचे लष्कर दोन मोठ्या युद्धसरावात सहभागी होणार आहेत. १३ ते २३ जानेवारी दरम्यान हे युद्धसराव आयोजित होतील. यापैकी फ्रिडम शिल्ड हा पूर्णपणे कॉम्प्युटरवर आधारीत प्रशिक्षण सराव असेल. दक्षिण कोरियाची सुरक्षा तसेच प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेत वाढ होईल, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलप्रमुखांचे प्रवक्ते कर्नल ली सूंग जुन यांनी दिली.
हा कॉम्प्युटर सिम्युलेटेड सराव सुरू असताना अमेरिका व दक्षिण कोरियन लष्करामध्ये ‘वॉरिअर शिल्ड एफटीएक्स’ हा युद्धसराव देखील पार पडेल. योजनेतील प्रत्युत्तर प्रत्यक्षात युद्धभूमीत उतरविण्याचा सराव यानिमित्ताने केला जाईल, असे अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते कर्नल आयसॅक एल. टेलर म्हणाले. यामध्ये दोन्ही देशांच्या ॲम्फिबियस युद्धनौका सहभागी होतील.
दरम्यान, अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करातील कोणताही नवा युद्धसराव भीषण प्रत्युत्तराला आमंत्रण देणारा ठरेल, अशी धमकी उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात दिली होती. तसेच उत्तर कोरियाने अण्वस्त्र हल्ल्यांची धमकीही दिली होती. पण उत्तर कोरियाच्या या धमकीला आपण अजिबात किंमत देत नसल्याचे अमेरिका व दक्षिण कोरियाने दाखवून दिले आहे.