नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनी उडवून देण्याचे लाभ अमेरिकेला मिळाले

- फ्रान्सच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचा दावा

इंधनवाहिनीपॅरिस – रशियातून जर्मनीला इंधनाचा पुरवठा करणारी ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीचा स्फोट झाल्यानंतर, याला रशियाच जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. तर ही इंधनवाहिनी उडवून देण्यामागे अमेरिकेचे कारस्थान असल्याचा ठपका रशियाने ठेवला होता. रशिया आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सातत्याने अमेरिकेवर हा आरोप करीत आहे. या स्फोटाच्या तपासाची जबाबदारी जर्मनी, स्वीडन आणि डेन्मार्कच्या तपास यंत्रणांनी स्वीकारली होती. पण बरीच माहिती हाती आल्यानंतरही याबाबत अधिकृत पातळीवर चकार शब्द उच्चारला जात नाही, याकडे फ्र्रान्सच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनी अमेरिकेनेच उडवून दिली आणि तीन देशांच्या तपासयंत्रणा ही बाब जगजाहीर करण्यास तयार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा फ्रान्सच्या माजी अधिकाऱ्याने केला.

जर्मनी, स्वीडन आणि डेन्मार्कच्या तपासयंत्रणा अजूनही याबाबत काही सांगायला तयार नाहीत. त्यामुळे नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीच्या स्फोटाचा तपास गुंडाळून ठेवण्याची तयारी झाली आहे, असा निष्कर्ष फ्रान्सचे माजी जनरल डॉमिनिक त्रिंक्वांद यांनी नोंदविला आहे. इतकेच नाही तर सदर स्फोट कुणी घडवला याचा विचार करीत असताना, आधी यापासून कुणाला सर्वाधिक फायदा होईल, याचा विचार करायला हवा, असे त्रिंक्वांद यांनी म्हटले आहे. ही इंधनवाहिनी रशियन कंपनीने उभारली व त्यात रशियाची गुंतवणूक आहे. त्यामुळे ही पाईपलाईन उडवून रशियाला फायदा होणार नाही, हे उघड आहे, याकडे फ्रान्सच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

ही इंधनवाहिनी उडवून देऊन अमेरिकेलाच सर्वाधिक लाभ होणार असल्याचा दावा करून अमेरिकेनेच हे घडवून आणले असावे. पण तीन देशांच्या तपासयंत्रणा हे उघड करायला तयार नाहीत. याचा अर्थ नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीच्या घातपाताचे प्रकरण जर्मनी, स्वीडन आणि डेन्मार्कच्या तपासयंत्रणा गुंडाळण्याच्या प्रयत्नात आहेत असा होतो, असे त्रिंक्वांद पुढे म्हणाले. याआधी रशियाने यासाठी थेट अमेरिकेवरच आरोप केले होते. अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया न्यूलँड यांनी काही आठवड्यांपूर्वी नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीत स्फोट झाला, हे चांगलेच झाले, असे सांगून त्यावर आनंद व्यक्त केला होता. रशियाने त्यांची ही प्रतिक्रिया उचलून धरली होती.

न्यूलँड यांची प्रतिक्रिया ही इंधनवाहिनी अमेरिकेनेच उडवून दिल्याचे दाखवून देत असल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. तसेच हे दहशतवादी कृत्य असल्याची जळजळीत टीकादेखील रशियाने केली होती. मात्र रशियाच्या या आरोपांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण फ्रान्सच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केलेला दावा रशियाने केलेल्या आरोपांना दुजोरा देत आहे. या इंधनवाहिनीच्या प्रकल्पातील महत्त्वाचा भागीदार असलेल्या जर्मनीने या प्रकरणी अमेरिकाधार्जिणी भूमिका स्वीकारली असून यामुळे रशिया करीत असलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करणे पाश्चिमात्य देश व माध्यमांना सोपे जात आहे.

leave a reply