सेऊल – उत्तर कोरियाने मंगळवारी जपानच्या हद्दीवरुन क्षेपणास्त्र डागून पूर्व आशियामध्ये तणाव वाढविला होता. जपानने आपल्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला होता. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसरावाच्या विरोधात उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र चाचणी केल्याचे बोलले जात होते. उत्तर कोरियाच्या या चिथावणखोर कारवाईला उत्तर देण्यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने चार क्षेपणास्त्रांची चाचणी केली. यापैकी एक चाचणी अपयशी ठरल्याचा दावा केला जातो.
उत्तर कोरिया येत्या काही दिवसात अणुचाचणी करणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा ओघ वाढविल्याचा दावा केला जातो. त्यातच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या नौदलाने यलो सीच्या क्षेत्रात मोठा सराव आयोजित केला होता. यामुळे संतापलेल्या उत्तर कोरियाने दहा दिवसात पाच वेळा क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या.
यापैकी मंगळवारी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राने थेट जपानच्या हवाई हद्दीतून प्रवास केल्यामुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. जवळपास साडेचार हजार किलोमीटर्स अंतर ओलांडणाऱ्या या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करून उत्तर कोरियाने अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानला इशारा दिल्या दावा केला जातो. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर ताशेरे ओढले.
तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाने बुधवारी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी चार क्षेपणास्त्रे डागली. यातील एक क्षेपणास्त्र हवेत असतानाच उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाच्या सागरी क्षेत्रात असलेली अमेरिकेची ‘रोनाल्ड रिगन’ ही विमानवाहू युद्धनौका देखील आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह अजूनही जपानच्या बंदरात तैनात असल्याचा इशारा अमेरिकेकडून दिला जात आहे. अणुचाचणीच्या तयारीत असलेल्या उत्तर कोरियातील किम जाँग-उन यांच्या राजवटीला बजावण्यासाठी अमेरिकेने हा इशारा दिल्यचा दावा केला जातो.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी दक्षिण कोरिया व जपानचा दौरा केला होता. त्यानंतर उत्तर कोरियाने एकापाठोपाठ एक पाच क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. उत्तर कोरियाने चाचणी केलेले क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीतून जाण्याची गेल्या पाच वर्षातील ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे ही चाचणी कोरियन क्षेत्रातील तणावात अधिकच भर टाकणारी ठरली आहे.