उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचा सराव

सेऊल/टोकिओ – उत्तर कोरियाने मंगळवारी जपानच्या हद्दीवरून क्षेपणास्त्र डागत नवी चाचणी केल्याचे समोर आले. या चाचणीने कोरियन क्षेत्रातील तणाव अधिकच वाढला असून जपानने आपल्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. तर अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांनी यलो सी व नजिकच्या भागात ‘बॉम्बिंग टार्गेटस्‌‍’चा सराव करीत उत्तर कोरियाला इशारा दिला. गेल्या 10 दिवसात उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पाचवी वेळ आहे.

उत्तर कोरियाने चीन सीमेनजिक असणाऱ्या ‘मुप्योंग-रि’ या चाचणी क्षेत्रातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. सकाळी सव्वासातच्या सुमारास डागलेले हे क्षेपणास्त्र पाच मिनिटांनी जपानच्या तोहोकु प्रांतावरून पुढे जाऊन पूर्व किनारपट्टीच्या क्षेत्रात कोसळले. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राने जवळपाच साडेचार हजार किलोमीटर्सचा प्रवास केल्याचे सांगण्यात येते. उत्तर कोरियाने केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीतील ही सर्वात दीर्घ पल्ल्याची चाचणी ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी दक्षिण कोरिया व जपानचा दौरा केला होता. त्यानंतर अमेरिकेसह जपान व दक्षिण कोरियाने संयुक्त नौदल सरावाचे आयोजन केले होते. हा सराव म्हणजे उत्तर कोरियावरील आक्रमणाची तयारी असल्याचा आरोप हुकुमशहा किम जाँग उन यांनी केला होता. हॅरिस यांचा दौरा व नौदल सरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने एकापाठोपाठ एक पाच क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. त्यातील मंगळवारची चाचणी सर्वाधिक यशस्वी ठरल्याचे सांगण्यात येते.

उत्तर कोरियाने चाचणी केलेले क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीतून जाण्याची गेल्या पाच वर्षातील ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे ही चाचणी कोरियन क्षेत्रातील तणावात अधिकच भर टाकणारी ठरली आहे. कोरियाचे क्षेपणास्त्र आपल्या हद्दीतून गेल्यावर जपानने आपल्या नागरिकांना दक्षतेचा इशारा जारी केला होता. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका व दक्षिण कोरियाने आपल्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने आक्रमक सराव सुरू केला. यात ‘एफ-16’ व ‘एफ-15’ या लढाऊ विमानांनी सागरी क्षेत्रातील लक्ष्य भेदण्याचा अभ्यास केल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराकडून सांगण्यात आले.

leave a reply