अमेरिकेच्या नव्या अंतराळयानाला ‘कल्पना चावला’ यांचे नाव

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘नॉर्थ्रोप ग्रुमन’ने आपल्या नव्या अंतराळयानाला भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर ‘कल्पना चावला’ यांचे नाव दिले आहे. अंतराळवीर कल्पना चावला यांनी अंतराळक्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या मोहिमेतून अंतराळात जाणाऱ्या कल्पना चावला या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला होत्या. त्यांना मिळालेला हा सन्मान भारतासाठी अभिमानास्पद क्षण ठरतो.

अमेरिकेच्या नव्या अंतराळयानाला 'कल्पना चावला' यांचे नावअवकाशात कार्यरत असलेल्या ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ला आवश्यक सामुग्री पाठविण्याच्या मोहिमेसाठी ‘नॉर्थ्रोप ग्रुमन’ कंपनीची निवड करण्यात आली आहे. ‘नॉर्थ्रोप ग्रुमन’चे ‘सिग्नस- एनजी १४’ हे यान २९ सप्टेंबर रोजी अंतराळात झेपावणार आहे. या यानाला त्यांनी ‘एस. एस. कल्पना चावला’ असे नाव दिले आहे.

नासाच्या मोहिमेसाठी अंतराळात जाणाऱ्या यानाला अंतराळवीरांची नावे देण्याची या कंपनीची परंपरा आहे. यानुसार नव्या यानाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले. अंतराळवीर कल्पना चावला यांनी अंतराळक्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली होती. त्याचा सन्मान म्हणून यानाला नाव देण्यात आले. यापुढे ‘सिग्नस’ यान कल्पना चावला यांच्या नावाने ओळखले जाईल, असे या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. ‘नासा’नेही सोशल मीडियावरुन या माहितीला दुजोरा दिला.

अमेरिकेच्या नव्या अंतराळयानाला 'कल्पना चावला' यांचे नावकल्पना चावला यांचा जन्म हरियाणातल्या कर्नालमध्ये झाला. लहानपणापासूनच विमान, रॉकेट यासारख्या गोष्टींचे वेड असल्यामुळे कल्पना चावला यांनी अंतराळक्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या होत्या. एरोस्पेस इंजिनिअरची पदवी घेतलेल्या कल्पना चावला यांना १९८८ साली ‘नासा’मध्ये काम करण्याची सुर्वणसंधी मिळाली. अंतराळवीराचे प्रशिक्षण घेतल्यानंतर नासाच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

२००३ सालच्या अंतराळ मोहिमेदरम्यान ‘कोलंबिया स्पेस शटल’ला झालेल्या दुर्घटनेदरम्यान कल्पना चावला यांचा मृत्यु झाला होता. स्पेस शटल पृथ्वीच्या कक्षेत येण्यासाठी काही मिनिटे बाकी असतानाच ही दुर्घटना घडली. त्यानंतर जगभरातून त्यावर हळहळ व्यक्त केली गेली. भारतासह जगभरात अंतराळक्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणींसाठी कल्पना चावला या प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जातात.

leave a reply