इराणबरोबरील अणुकरार अंतिम टप्प्यात असताना इस्रायलसह आखाती देशांना आश्‍वस्त करण्यासाठी अमेरिकेची धडपड

आश्‍वस्त करण्यासाठीजेरूसलेम – इराण व पाश्‍चिमात्य देश अणुकराराच्या अगदी समीप पोहोचल्याचे दिसत आहे. त्याच प्रमाणात इस्रायल व इराणच्या विरोधात खडे ठाकलेले आखाती देश अस्वस्थ झाले आहेत. त्यांना आश्‍वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इस्रायलमध्ये धाव घेतली. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांच्याबरोबरील पत्रकार परिषदेत बोलताना, इस्रायलप्रमाणे अमेरिकेलाही इरणला अण्वस्त्रसज्ज होऊ द्यायचे नाही, असे आश्‍वासन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले. तर इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी आपला देश इराणबरोबरील अणुकराराशी बांधिल नसल्याचे सांगून इराणपासून असलेल्या धोक्याविरोधात इस्रायल कुठलीही कारवाई करू शकतो, असा सज्जड इशारा दिला.

अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी २०१५ साली इराणबरोबर केलेला अणुकरार, २०१८ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निकालात काढून यातून माघार घेतली होती. या कराराचा वापर करून इराण अणुबॉम्बच्या दिशेने पावले टाकत असल्याचा आरोप अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता. पण ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, पुन्हा या अणुकरारासाठी प्रयत्न सुरू झाले. लवकरच हा करार पूर्णत्त्वास जाईल, असे दावे केले जातात. यासाठी युरोपिय देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी इराणमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे.

असे असले तरी नव्या अणुकराराचे तपशील अजूनही जगासमोर आलेले नाहीत. अशा परिस्थितीत अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांच्या इराणबरोबरील अणुकराराच्या पार्श्‍वभूमीवर, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, मोरक्क्को आणि बाहरिन या देशांचे परराष्ट्रमंत्री इस्रायलशी चर्चा करणार आहेत. इस्रायलमध्ये होणारी ही परिषद ऐतिहासिक असल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बनेट यांनी केली. याचे फार मोठे दडपण अमेरिकेला जाणवू लागल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. म्हणूनच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन इस्रायलमध्ये येऊन इराणबरोबरील अणुकराराबाबत या देशाला आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कुठल्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, यावर अमेरिका ठाम आहे. म्हणूनच अमेरिकेने इराणबरोबर अणुकरारासाठी पुढाकार घेतला असून या करारामुळे इराणचा अणुकार्यक्रम एका चौकटीत बंदिस्त होईल, असा दावा ब्लिंकन यांनी केला. मात्र त्यांनी इराणबरोबरील अणुकराराचे केलेले हे समर्थन इस्रायलला मान्य नसल्याचे उघड झाले आहे.

इस्रायले परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी अमेरिका व पाश्‍चिमात्य देश इराणबरोबर करीत असलेल्या कराराशी इस्रायल बांधिल नाही, असे बजावले आहे. इतकेच नाही तर इराणपासून धोका संभवला तर इस्रायल आपल्याला आवश्यक तो निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. कारण इराणपासून इस्रायलला संभवणारा धोका, वैचारिक पातळीवरचा नाही, तर इराणने इस्रायल नष्ट करून टाकण्याच्या धमक्या दिल्या होत्या, याची आठवण इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली आहे.

काहीही झाले तरी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी इस्रायल कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, असे या देशाच्या नेत्यांनी वारंवार बजावले होते. इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायल लष्करी कारवाईचा पर्याय वापरताना कचरणार नाही, असा इशारा पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनीही दिला होता. अमेरिका इराणबरोबर अणुकरार करून फार मोठी चूक करीत आहे, याची जाणीव इस्रायल सातत्याने करून देत आहे. अशा परिस्थितीत इस्रायलसह इराणविरोधी आखाती देशांना या अणुकराराच्या मुद्यावर समजावणे अमेरिकेसाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे. परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्या या इस्रायल भेटीत ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

leave a reply