अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून ‘गन राईट्स’ची व्याप्ती वाढविणारा निकाल

- न्यूयॉर्कमधील कायदा रद्दबातल

न्यूयॉर्क – न्यूर्यार्कमध्ये हँडगनच्या वापरावर निर्बंध टाकणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेत असलेल्या ‘सेकंड अमेंडमेंट’नुसार असलेला शस्त्र बाळगण्याचा हक्क हा इतर हक्कांच्या तुलनेत दुय्यम दर्जाचा नाही, असे न्यायालयाने निकालात बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अमेरिकेच्या सत्ताधारी वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासातच अमेरिकी सिनेटमध्ये बंदुकीच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भातील विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यात अमेरिकेत घडणाऱ्या ‘मास शूटिंग’च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जून या साडेपाच महिन्यांच्या काळात 250हून अधिक ‘मास शूटिंग’च्या घटना घडल्या असून त्यात सुमारे 400 जणांचा बळी गेला आहे. मे महिन्यात टेक्सास व न्यूयॉर्कमध्ये घडलेल्या शूटिंगच्या घटनांवर अमेरिकी जनतेसह राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसदेत बंदुकीच्या वापरांवर निर्बंध आणणारे नवे विधेयकही दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला पूर्ण मंजुरी मिळणे बाकी असतानाच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समोर आला.

न्यूयॉर्कमधील दोन नागरिकांनी गेल्या शतकात लागू करण्यात आलेल्या ‘गन कंट्रोल’ कायद्याला आव्हान दिले होते. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने सहा विरुद्ध तीन मतांनी न्यूयार्कमधील जुना कायदा रद्दबातल ठरविला. आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेतील 14व्या व दुसऱ्या घटनादुरुस्तीचा उल्लेख केला. 14व्या अमेंडमेंटनुसार, अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला समान सुरक्षा मिळविण्याचा हक्क आहे. तर ‘सेकंड अमेंडमेंट’नुसार स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. न्यूयॉर्कमधील कायदा या दोन्हींचे उल्लंघन करतो, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने अमेरिकेतील शस्त्रांचा वापर व ‘गन लॉबी’ला विरोध करणाऱ्या गटांना मोठा धक्का बसला आहे. सदर निर्णय बायडेन प्रशासनासाठीही हादरा देणारा ठरतो. गेल्या काही महिन्यातील वाढत्या मास शूटिंगच्या घटनांनंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ‘गन कंट्रोल’संदर्भातील नियमांसाठी पुढाकार घेतला होता. अमेरिकेतील अनेक राज्यांना आवाहनही करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बायडेन प्रशासनासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकी संसदेच्या सिनेटमध्ये ‘गन कंट्रोल’बाबत दाखल करण्यात आलेले विधेयक 65 विरुद्ध 33 मतांनी मंजूर करण्यात आले. गेल्या तीन दशकात अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ‘गन कंट्रोल’ विधेयकाला मान्यता मिळण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

leave a reply