अमेरिका-तैवानला चीनकडून जबरदस्त धक्का दिला जाईल

- चीनच्या मुखपत्राचा इशारा

जबरदस्त धक्काबीजिंग – ‘अमेरिका आणि तैवानने चीनच्या संयमाचा चुकीचा अर्थ लावू नये. कारण चीन अमेरिका आणि तैवानला कोणत्याही क्षणी धक्का देऊ शकतो. या दोन्ही देशांनी चीनकडून मिळणार्‍या जबरदस्त धक्क्यासाठी तयार रहावे’, असा इशारा चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राने दिला. दोन दिवसांपूर्वी अमेरिकी हवाईदलाचे मालवाहू विमान तैवानमध्ये उतरले होते. अमेरिकेने चीनच्या परवानगीशिवाय आपले विमान तैवानमध्ये उतरविल्यामुळे चीन संतापला आहे. या पार्श्‍वभूमीवर, आपल्या मुखपत्राद्वारे चीनने अमेरिका आणि तैवानला धमकावल्याचे दिसते.

अमेरिकेच्या हवाईदलाचे ‘सी-146ए वुल्फहाऊंड’ मालवाहू विमान गुरुवारी तैवानची राजधानी तैपेईच्या साँगशॅन विमानतळावर उतरले. जपानच्या ओकिनावा बेटावरुन उड्डाण केलेले सदर विमान तैवानच्या ‘अमेरिकन इन्स्टिट्युट इन तैवान’ या अमेरिकेच्या राजनैतिक कार्यालयासाठी पार्सल घेऊन आले होते. अमेरिकेच्या हवाईदलातील या विमानाचा वापर आपत्ती किंवा युद्धक्षेत्रात अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या बचावासाठी केला जातो. या विमानाच्या या प्रवासावर अमेरिका आणि तैवानने प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

पण अमेरिकन हवाईदलाच्या विमानाने तैवानमध्ये केलेल्या लँडिंगवर चीनने तीव्र संताप व्यक्त केला. तैवान हा आपलाच सार्वभौम भूभाग असल्याचा दावा करणार्‍या चीनने तैवानसह अमेरिकेलाही धमकावले. ‘चिनी सरकारच्या रितसर परवानगीनंतरच दुसर्‍या देशाला चीनच्या क्षेत्रात विमाने दाखल करता येतात. त्यामुळे तैवानमध्ये विमान उतरविणार्‍या अमेरिकेने विस्तवाशी खेळ करू नये आणि स्वतंत्र तैवानची मागणी करणार्‍या विघटनवाद्यांना चुकीचे संदेश देण्याचे त्वरीत थांबवावे’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला होता.

जबरदस्त धक्कातर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने अमेरिका आणि तैवानला धमकावले. ‘सर्वात मोठे सैन्यदल असले तरी अमेरिका आपले बहुतांश लष्करी सामर्थ्य तैवानच्या सुरक्षेसाठी या क्षेत्रात तैनात करू शकत नाही. शिवाय तैवानचा बचाव करून पाहणार्‍या अमेरिकेला या आघाडीवर अमेरिकी जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. पण तैवानचे विलिनीकरण करण्यासाठी चीनकडे जनतेचा पाठिंबा आणि इच्छाशक्ती दोन्ही आहे’, असा दावा या मुखपत्राने केला.

अमेरिका आणि तैवान आपल्या कुरापतींद्वारे चीनला धक्के देण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप चिनी मुखपत्राने केला. याने चीनचे काही वाकडे होणार नाही. पण कुठल्याही क्षणी चीनची लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत प्रवेश करतील, तैवानच्या नेत्यांना अद्दल घडविण्यासाठी क्षेपणास्त्रे तैवानवर धडकतील. या धक्क्यासाठी अमेरिका आणि तैवानने तयार रहावे, असा इशारा या मुखपत्राने दिला. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून तैवानच्या मुद्यावर चीन अधिक आक्रमक झाला असून अमेरिका, जपानला यावरून सातत्याने धमकावित आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकार्‍यांनी जपानला अणुबॉम्बचे हल्ले चढविण्याची धमकी दिली होती.

leave a reply