२६/११ चा गुन्हेगार तहव्वूर राणाला अमेरिका भारताच्या हवाली करणार

नवी दिल्ली – २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर हुसेन राणाला अमेरिका भारताच्या ताब्यात देणार आहे. भारताने तहव्वूर राणाचा ताबा अमेरिकी यंत्रणांकडे मागितला होता. भारताने केलेल्या या प्रत्यार्पणाच्या मागणीनंतर अमेरिकेने तहव्वूर राणा पुन्हा अटक केल्याचे आणि त्याच्या भारताच्या हवाली करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वृत्त आहे. तहव्वूर राणाची सुरु झालेली प्रत्यार्पण प्रक्रिया आणि यासाठी त्याला झालेली अटक भारताचा विजय असल्याचे २६/११ च्या खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. तसेच भारतातील ‘आयएसआय’च्या हालचालींबाबत अधिक माहिती तहव्वूर राणाच्या चौकशीतून समोर येईल, असा दावाही निकम यांनी केला.

26-11२००८ सालच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणाची मोठी भूमिका होती. पाकिस्तानच्या लष्करातून निवृत्तीनंतर कॅनडाचे नागरिकत्व स्वीकरणाऱ्या राणाने अमेरिकेत आपला व्यवसाय सुरु करून त्याच्याआड दहशतवादी संघटनांना मदत सुरु केली होती. राणाला मुंबई हल्ल्याच्या कटाची आधीपासून महिती होती, असे या कटातील आणखी एक आरोपी आणि त्याचा मित्र डेव्हिड हेडलीने मुंबई न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या आपल्या जबाबात संगितले होते. त्याच्या व्यवसायाच्या कामानिमित्तच आपण मुंबईत आलो आणि रेकी करून मुंबईतील संवेदनशील ठिकाणचे फोटोग्राफ काढले. हे फोटो नंतर ‘लश्कर-ए-तोयबा’ला दिले होते. तसेच या सर्वाचा खर्चही तहव्वूर राणाने उचलला होता, अशी माहितीही हेडलीने न्यायालयात दिली होती.

तहव्वूर राणा आणि हेडली या दोघांनाही अमेरिकन न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. हेडलीला अमेरिकेत ३५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली आहे, तर तहव्वूर राणाला शिकागो न्यायालयाने २०१३ साली १४ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मुंबईतील हल्ल्यासाठी ‘लश्कर’ला सहाय्य पुरविण्याबरोबर डेनमार्कमधील एका वृत्तपत्रावर हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी राणाला ही शिक्षा झाली आहे. काही दिवसांपूर्वी राणाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांसाठी कारागृहातून सोडण्यात आले. मात्र भारताच्या प्रत्यार्पणाच्या मागणीनंतर राणाला १० जूनला पुन्हा अटक करण्यात आली.

मे महिन्यातच अमेरिकेने अल कायदाच्या दहशतवाद्याला भारताच्या हवाली केले होते. मुंबईत हल्ल्यात सामील तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्याची तयारी अमेरिका करीत आहे. यावरून भारत आणि अमेरिकेमधील दहशतवादविरोधी सहकार्य अधिकाच व्यापक बनल्याचे स्पष्ट होते.

leave a reply