२६/११च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला अमेरिका भारताकडे सोपविणार

नवी दिल्ली – मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यासाठी सहाय्य पुरविणाऱ्या तहव्वूर राणा याला भारताकडे सोपविण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया डिस्ट्रीक कोर्टाच्या न्यायाधीश जॅकलिन चूूलजिअन यांनी तहव्वूर राणा याला भारताच्या हवाली करण्याचे आदेश दिले. भारत आणि अमेरिकेमध्ये गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्याचा करार झालेला आहे. त्यानुसार राणा याला भारताकडे सोपविण्यात यावे, असे न्यायाधीश चूलजिअन यांनी आपल्या ४८ पानांच्या निकालपत्रात म्हटले आहे. हा भारतासाठी फार मोठा विजय ठरतो. यामुळे २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा असल्याचा भारताचा आरोप नव्याने सिद्ध होईल, असा दावा करण्यात येत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याचे स्वागत केले आहे.

२६/११च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला अमेरिका भारताकडे सोपविणारडेव्हिड कोलमन हेडली व तहव्वूर राणा या दोघांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यासाठी सहाय्य केले होते. १६६ जणांचा बळी घेणारा हा भीषण हल्ला झाल्यानंतर आपण ‘रिलॅक्स’ झाल्याचे राणा याने हेडलीला सांगितले होते. तसेच पाकिस्तानकडून आपल्याला या सेवेसाठी ‘मेडल’ अपेक्षित असल्याचे तहव्वूर राणा म्हणाला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून तहव्वूर राणा याचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. याला यश मिळाले असून हा भारतासाठी फार मोठा विजय ठरतो, असा दावा करण्यात येत आहे. कारण कॅनडातील पाकिस्तानी वंशाचा बिझनेसमन असल्याचे दावे करणारा तहव्वूर राणा दहशतवाद्यांना सहाय्य करीत होता.

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना हवी असलेली मदत तहव्वूर राणाने पुरविली होती, हे उघड झाले आहे. त्यामुळे अमेरिकेकडून त्याचे भारताला केले जाणारे प्रत्यार्पण या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करणारी बाब ठरू शकेल. त्यामुळे हा पाकिस्तानला बसलेला फार मोठा धक्का ठरतो. भारताच्या परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी अमेरिकी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. गेल्या कित्येक वर्षांपासून भारत तहव्वूर राणा याचा ताबा मिळविण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करीत होता, अशी माहिती देखील परराष्ट्र सचिव क्वात्रा यांनी दिली आहे.

२६/११च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले होते. त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयने ‘लश्कर-ए-तोयबा’मार्फत घडविल्याचे जगजाहीर झाले होते. पण आता तहव्वूर राणाकडून भारतीय तपास यंत्रणा या दहशतवादी हल्ल्याच्या कटाची तपशीलवार माहिती मिळवू शकतात. यामुळे हा हल्ला दहशतवादी संघटनांनी अर्थात ‘नॉन स्टेट ॲक्टर्स’नी घडविलेला असून आपला त्याच्याशी संबंध नसल्याचा पाकिस्तानचा दावा निकालात निघू शकतो. याचे फार मोठे परिणाम संभवतात.

पाकिस्तान हा उघडपणे दहशतवादाचा वापर करणारा देश आहे, हा भारताचा आरोप यामुळे अधिकच भक्कम होईल. यामुळे पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याच्या मागणीला बळ मिळू शकेल.

हिंदी

 

leave a reply