पॅसिफिक क्षेत्रात चीनने फिलिपाईन्सवर हल्ला केल्यास अमेरिकेकडून चोख प्रत्युत्तर मिळेल

- अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनने पॅसिफिक क्षेत्रात फिलिपाईन्सच्या संरक्षणदलांवर, जहाजांवर किंवा विमानांवर हल्ला केल्यास त्याला अमेरिका लष्करी पातळीवर चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या तटरक्षकदलाच्या जहाजाने फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाच्या जहाजाला आक्रमकपणे धडक देण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेवरून पाश्चिमात्य देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिकेने दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो.

चोख प्रत्युत्तरगेल्या आठवड्यात फिलिपाईन्सची दोन गस्ती जहाजे साऊथ चायना सीचा भाग असलेल्या ‘स्प्रॅटले’ बेटसमूहांच्या क्षेत्रात गस्त घालत होती. त्यावेळी चीनच्या तटरक्षक दलाच्या एका जहाजाने धोकादायकरित्या फिलिपिनी जहाजाच्या मार्गात आडवे येऊन रोखण्याचा प्रयत्न केला. फिलिपिनी जहाजाच्या कमांडरने कौशल्याने आपली बोट वळविल्याने दोन बोटींची टक्कर टळली. हा सर्व प्रसंग फिलिपिनी जहाजांवर असलेल्या प्रसारमाध्यमांनी चित्रित केला आहे.

चीनच्या जहाजाने नियमित गस्तीची वाट अडविल्याने फिलिपाईन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चीनचे तटरक्षक दल आक्रमक व चिथावणीखोर कारवायांचा वापर करीत असल्याची टीका फिलिपाईन्सने केली. त्याला प्रत्युत्तर देताना चीनने फिलिपाईन्सची जहाजे आपल्या हद्दीत प्रवेश न घेता घुसल्याचा दावा केला. त्यावर, आमच्या हद्दीत गस्त घालण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही असा खरमरीत टोला फिलिपाईन्सने लगावला आहे.

चोख प्रत्युत्तरचीन व फिलिपाईन्समधील या घटनेवर आंतरराष्ट्रीय समुदायातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. चीनकडून फिलिपिनी जहाजांना सातत्याने त्रास देण्याचे तसेच धमक्यांचे सत्र सुरू असल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केला. चीनच्या राजवटीने असे चिथावणीखोर व असुरक्षित वर्तत टाळावे, असा सल्ला परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी दिला. त्याचवेळी चीनने फिलिपाईन्सची संरक्षणदले, जहाजे अथवा विमानांवर हल्ला केल्यास अमेरिका त्याला लष्करी पातळीवर प्रत्युत्तर देईल, असेही मिलर यांनी बजावले.

गेली कित्येक वर्षे साऊथ चायना सीच्या वादावरुन चीन व फिलिपाईन्समध्ये तणाव निर्माण झाला आहे. फिलिपाईन्सचे सागरी क्षेत्र असलेले ‘वेस्ट फिलिपाईन्स सी’चा भागदेखील आपल्या मालकीचा असल्याचा दावा चीन करीत आहे. या सागरी क्षेत्रातील ‘स्प्रॅटले’ आणि ‘स्कारबोरो’ या द्विपसमुहांवर फिलिपाईन्सचा प्रशासकीय अधिकार आहे. पण २०१२ साली चीनने येथील काही बेटांवर आपला हक्क असल्याचे सांगून त्यांचे लष्करीकरण तसेच काही कृत्रिम बेटांची निर्मितीही सुरू केली होती.

leave a reply