बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिका व चीनमध्ये १९७९ साली राजनैतिक सहकार्य प्रस्थापित झाल्यानंतर प्रथमच दोन देशांमधील संबंध रसातळाला जाऊन पोहोचल्याचा दावा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी केला. अमेरिकेला आव्हान देण्याचा, अमेरिकेची जागा घेण्याचा किंवा त्याच्याशी संघर्ष करण्याचा चीनचा हेतू कधीही नव्हता, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बचावात्मक भूमिकेचे संकेतही दिले. अमेरिका व चीनच्या अभ्यासगटांचा समावेश असलेल्या एका कार्यक्रमात चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात अमेरिकेतील ज्येष्ठ मुत्सद्दी व माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचाही सहभाग होता अशी माहिती देण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधातील संघर्षाची धार अधिकच तीव्र केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ नेते व अधिकारी सातत्याने चीनला लक्ष्य करीत आहेत. अमेरिकेची संसद तसेच महत्त्वाच्या विभागांनी चीनच्या सत्ताधारी राजवटीला धक्का देणारे अनेक निर्णय घेतले आहेत. चीन विरोधातल्या मोहिमेत अमेरिकेने आपल्या अनेक मित्रदेशांनाही सहभागी करून घेतले आहे. साऊथ चायना सी, हॉंगकॉंग, उघुरवंशीय यासारख्या अनेक मुद्द्यांवरून चीनची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अमेरिकेच्या मोहिमेला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची आक्रमक भाषा करणारा चीन जेरीस आल्याचे संकेत चिनी नेत्यांच्या वक्तव्यांमधून मिळत आहेत. काही आठवड्यांपूर्वी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी, अमेरिकेबरोबर व्यापारी करारासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. गेल्या महिन्यात चीनचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांनी अमेरिकेच्या हवाई बेटांवर परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेबरोबर संघर्ष नको असून शांततापूर्ण सहकार्य हवे आहे अशी भूमिका व्यक्त केली आहे.
अमेरिका व चीन दोघांनीही एकाच वेळी सहकार्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून त्यासाठी तीन गोष्टींवर भर द्यावा लागेल, असे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी सुचविले. त्यात दोन्ही देशांमध्ये सहकार्य शक्य आहे अशा गोष्टी आणि ज्यावर चर्चा आवश्यक आहे असे मुद्दे यांचा समावेश असल्याचे यी यांनी सांगितले. काही घटकांबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत होण्याची शक्यता नाही हे देखील ध्यानात ठेवायला हवे, असे सांगून चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका व चीनमधील तणाव संपणारा नाही असेही संकेत दिले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व चीनमध्ये नवे शीतयुद्ध सुरू झाल्याचे दावे काही विश्लेषक व नेत्यांकडून करण्यात येत आहेत. चीनमधूनही अशी वक्तव्ये समोर आली आहेत. अशा पार्श्वभूमीवर, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेबरोबर संबंध रसातळाला गेल्याची कबुली देत बचावात्मक भूमिका घेणे लक्ष वेधून घेणारे ठरते.