उत्तर प्रदेश, बिहारमध्ये वीज कोसळून ४३ जणांचा बळी

- दीड महिन्यात २५३ जण दगावले

लखनौ/पटना – बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये ४३ जणांचा बळी गेला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर या दोन्ही राज्यांत वादळी पाऊस आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या दीड महिन्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये २५३ जणांचे प्राण गेले आहेत. या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये वीज कोसळून ४३ जणांचा बळीशनिवारी उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे उत्तर प्रदेशच्या पाच जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून २४ जण दगावले. यात प्रयागराजमध्ये आठ, मिर्जापूरमध्ये सहा, भदौईत सहा, कौशांबीमध्ये दोन तर जौनपूर, आझमगड, गाजीपूर आणि सोनभद्रमध्ये एकाचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तसेच बिहारच्या तीन जिल्ह्यात वीज कोसळून २० जण दगावले. यामध्ये भोजपूरमध्ये ९, सारणमध्ये ५, कैमूरमध्ये ३, पटना २ तर बक्सरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

याआधी २५ जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशमध्येही वीज कोसळून २४ जणांचा बळी गेला होता. पटना, मुजफ्फरपूर, भोजपूर, बक्सरसह अनेक जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे येथील काही भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बिहारमध्ये पुढील ७२ तासांचा अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील जनतेला सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

या दुर्घटनेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या दीड महिन्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत २५३ जणांचे प्राण गेले आहेत तर ४९ जण जखमी झाले आहेत अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एका अहवालात दिली आहे.

leave a reply