चोवीस तास कोरोनाचे लसीकरण चालणार

- केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली – देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी, तसेच लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास अर्थात २४ बाय ७ कोरोनाचे लसीकरण चालणार आहे. त्यामुळे कोविन पोर्टलर लसीकरणासाठी वेळेची निवड करताना आपल्या सोयीनुसार नागरिक वेळ निवडू शकतात. १ मार्चपासूनच देशात ६० वर्षांवरील सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरतो.

भारतात पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर्स, पोलीस जवानांना लसीकरण सुरू करण्यात आले होते. याच लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र या टप्पात ६० वर्षांवरील जेष्ठ व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. सामान्य नागरिकांचे लसीकरण सुरू केल्यावर सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठीही पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. यासाठी सर्वप्रथम वेळेचे बंधन दूर करण्यात आले आहे.

आतापर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यानच कोरोनाची लस देण्यात येत होती. यासाठी कोवीन पोर्टलवर जाऊन आपल्या सवडीनुसार तारीखेची व सकाळी ९ ते ५ पर्यंतच्या वेळेची निवड करण्याची सोय आहे. मात्र वेळेची मर्यादा असल्याने लसीकरण कंेंद्रांवर गर्दी दिसून येत होती. सरकारने गर्दी होऊ नये आणि आरोग्य यंत्रणावरील ताण कमी व्हावा यासाठी खाजगी रुग्णालयांमधूनही लस देण्याची व्यवस्था केली होती. यानुसार अडीचशे रुपयात एक याप्रमाणे ५०० रुपयात दोन लसी खाजगी रुग्णालयातून कोवीन पोर्टलवर नोंदणी करून घेता येत आहेत. पण येथेही वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आता ही वेळेची मर्यादा काढून टाकण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मात्र कोणत्या वेळेपर्यंत लसीकरण सुरू ठेवायचे हे रुग्णालयांवर अवलंबून आहे. रुग्णालये आपल्या क्षमतेनुसार हा निर्णय घेऊ शकतात आणि तो निर्णय राज्य सरकारांना कळवून पुढील सोपस्कार पार पाडू शकतात, असे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय सरकारने खाजगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र उभारण्यासाठी घातलेल्या शर्थीही काढून टाकल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिली.

याखेरीज केंद्र सरकारने आपल्या लसीच्या डोसचे रीशेड्यूल करण्याची मूभाही दिली आहे. देशात ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’ व ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च’ने (आयसीएमआर) मिळून विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’चे लसीकरण सुरू आहे. कोणत्याही लसींचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने घेणे आवश्यक आहे.

मात्र एक डोस घेतल्यावर एखादी व्यक्ती दुसर्‍या लसीसाठी त्याच शहरात काही कारणानिमित्त उपलब्ध नसेल, तर ती व्यक्ती लसीचा डोस रीशेड्यूल करू शकते. यानुसार कोविन अ‍ॅपवर आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगईन करून आपल्या नावाच्या पुढील अ‍ॅक्शन कॉलमवर जाऊन ठिकाण बदलता येईल. मात्र ठिकाण बदल किमान एक दिवस आदी करणे आवश्यक आहे. तसेच ठिकाणात बदल केला तरी त्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस मिळणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

लवकरच कोरोनाची नेजल लसही येणार

‘कोव्हॅक्सिन’ विकसित करणार्‍या भारत बायोटेकने नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लसही विकसित केली आहे. या नेजल लसीच्या चाचण्या पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. चेन्नाई, हैदराबाद, नागपूर आणि पटणा या शहरांमध्ये या चाचण्या घेतल्या जातील. यासंदर्भात भारत बायोटेकने ‘ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ कडे (डीसीजीआ) प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.

भारत बायोटेकने कोरोनावरील नेजल लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांची परवानगी मागितली आहे. भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापिठाबरोबर संशोधन करून ही लस विकसित केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या लसीचा केवळ एकच डोस असेल. एका डोसमध्येच कोरोनापासून नागरिकांना सुरक्षा कवच मिळेल. सध्या इंजेक्शनद्वारे देण्यात येणार्‍या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. नेजल लस आल्यावर इंजेक्शन पासून सुटका होईल.

दरम्यान, भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांमध्ये २५ हजार ८०० कार्यकत्या सहभागी झाले होते. भारतात कोरोना लसीच्या क्लिनिक ट्रायलमध्ये सहभागी झालेल्यांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या ठरते. या चाचण्यांमध्ये ‘कोव्हॅक्सिन’ कोरोनाविरोधात खूप प्रभावी सिद्ध झाली आहे. तसेच ही लस ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनवरही प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून लक्षात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे हे फार मोठे यश मानले जाते. तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू असतानाच केंद्र सरकारने ‘कोव्हॅक्सिन’च्या वापरास मंजुरी दिली होती.

leave a reply