इराणच्या राजधानीत खामेनी राजवटीविरोधात तीव्र निदर्शने

खामेनीतेहरान – इराणच्या खुझेस्तान प्रांतात पाणीटंचाईवरुन सुरू झालेल्या निदर्शनांचा भडका उडाला असून राजधानी तेहरानमध्ये हा वणवा दाखल झाला आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये पहिल्यांदा तेहरानच्या रस्त्यांवर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या. देशातील वाढते आर्थिक नैराश्य आणि सामाजिक वैफल्य यामुळे भडकलेली इराणी जनता या निदर्शनांमध्ये सामील होत असल्याचा दावा केला जातो. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी अवघे काही दिवस असताना राजधानी तेहरानमध्ये ही निदर्शने भडकली आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून इराणच्या खुझेस्तान प्रांतात पाणीटंचाईवरुन जोरदार निदर्शने सुरू आहेत. इराणच्या इंधन निर्यातीत सर्वाधिक योगदान देणार्‍या खुझेस्तानमधील पाणीटंचाईकडे देशातील राजवट दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. येथील सुमारे 700 गावांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. गेले दहा दिवस खुझेस्तानपर्यंत मर्यादित असलेली ही निदर्शने आता राजधानी तेहरान व इतर प्रमुख शहरांपर्यंत पसरल्याच्या बातम्या आखाती व पाश्‍चिमात्य माध्यमे देत आहेत.

इराणच्या राजकीय व्यवस्थेवर पकड असलेले सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात राजधानी तेहरानमध्ये घोषणा देण्यात आल्या. ‘हुकूमशहाचा नाश होवो’, ‘खामेनी यांचा धिक्कार असो’, ‘देशातून चालते व्हा’, ‘तोफा, रणगाडे, बंदूका आणि धार्मिक नेत्यांनी देश सोडावा’, ‘गाझा किंवा लेबेनॉनसाठी नाही, आम्ही फक्त इराणसाठी त्याग करू’, अशा घोषणा देतानाचे तेहरान व इतर शहरांमधील व्हिडिओ समोर आले आहेत. या निदर्शकांना इराणमधील वकिल, कलाकार, पत्रकार आणि परदेशस्थ इराणींचे देखील समर्थन मिळत आहे.

18 महिन्यानंतर राजधानी तेहरानमध्ये इराणच्या राजवटीविरोधात भडकलेली ही निदर्शने गंभीर बाब असल्याचा दावा इराणी तसेच आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. ‘देशातील जनता आपल्या राजवटीबाबत निराश असल्याशिवाय अशाप्रकारे रस्त्यावर उतरून निदर्शने आणि नाराजी व्यक्त करणार नाही’, असे तेहरानस्थित समाजशास्त्राचे अभ्यासक सईद मदानी यांनी स्पष्ट केले.

जून महिन्यात पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतही खामेनी राजवटीविरोधातील हा असंतोष पहायला मिळाला होता, याकडे इराणी विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांच्या राजवटीवर नाराज असलेल्या इराणी जनतेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. 1979 सालानंतर पहिल्यांदाच इराणमधील निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले होते. या निवडणुकीत खामेनी यांचे हस्तक इब्राहिम राईसी निवडून आले असले तरी राजवटीविरोधातील या असंतोषाचा फटका येत्या काळात राईसी यांना बसण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा इराणी विश्‍लेषक देत आहेत.

तेहरानसह इराणच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या या निदर्शनांबाबत इराणच्या यंत्रणा गोंधळ वाढविणार्‍या प्रतिक्रिया देत आहेत. ‘तेहरानमधील निदर्शनांचा खुझेस्तानमधील पाणीटंचाईशी संबंध नाही. तेहरानच्या काही भागात वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले होते. पण या निदर्शनांमध्ये राजवटविरोधात घोषणाबाजी झालीच नव्हती’, असे अजब दावे इराणी यंत्रणांनी माध्यमांकडे केले. तर मंगळवारी इराणी माध्यमांनी या निदर्शनांमागे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ असल्याचा आरोप केला.

इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी तेहरानसह देशातील इतर भागातील मोसादच्या एजंट्सना ताब्यात घेतले. या एजंट्सकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याचे इराणी माध्यमांचे म्हणणे आहे. या शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने इराणच्या राजवटीविरोधातील आंदोलनात हिंसाचार भडकविण्याचा कट इस्रायली गुप्तचर यंत्रणेने आखला होता, असा आरोप इराणच्या वृत्तवाहिनीने केला आहे. याआधीही इराणने आपल्या देशातील संशयास्पद स्फोट, आगींसाठी मोसादवर आरोप केला होता.

leave a reply