एजियन समुद्रात ग्रीस, तुर्कीच्या गस्तीजहाजांचे एकमेकांविरोधात ‘वॉर्निंग शॉट्स’

अथेन्स/अंकारा – एजियन समुद्रामध्ये ग्रीस व तुर्कीच्या गस्तीनौका आमनेसामने आल्या. यावेळी दोन्ही जहाजातील नौसैनिकांनी एकमेकांविरोधात ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडले. यामुळे सदर सागरी क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांनी ग्रीसच्या चिथावणीला योग्य ते प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी याच क्षेत्रात दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांचा असाच सामना झाला होता.

Turkey Recep-Tayyip-Erdogan-Greeceएजियन समुद्राबाबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, 1974 सालापासून ग्रीस व तुर्की तीन वेळा युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले होते. मधल्या काळात नाटोचे सदस्य असलेल्या दोन्ही शेजारी देशांमधील संबंध सुधारत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ग्रीस व तुर्कीच्या नेतृत्वामध्ये बैठकाही पार पडल्या होत्या. पण गेल्या काही वर्षांमध्ये निर्वासितांचे लोंढे, भूमध्य समुद्रातील इंधनवायूचे प्रचंड साठे आणि ऐतिहासिक अधिकारांवरुन या दोन्ही देशांमध्ये पुन्हा खटके उडू लागले आहेत.

अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य मिळालेला तुर्की एजियन समुद्रातील ग्रीसची बेटे व इतर क्षेत्रावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप ग्रीस करीत आहे. यासाठी ग्रीसने एजियन समुद्रातील बेटांवर लष्करी जमवाजमव वाढवली आहे. पण ग्रीस या सागरी क्षेत्राचे लष्करीकरण करीत असल्याचा ठपका तुर्कीने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ग्रीस व तुर्कीने एजियन समुद्रातील सागरी तसेच हवाई गस्त वाढवली आहे.

अशा परिस्थितीत, गुरुवारी ग्रीस व तुर्कीची गस्तीजहाजे परस्परांच्या समोर आली. तुर्कीच्या तटरक्षकदलाच्या बोटीने ग्रीसच्या गस्तीनौकेला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रीस करीत आहे. यावेळी सावध असलेल्या ग्रीसच्या जवानांनी ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडून तुर्कीच्या बोटीला माघार घेण्यास भाग पाडले. तर ग्रीसच्या छोट्या गस्तीनौकेने आपल्या बोटीजवळ धोकादायक प्रवास केल्यामुळे तुर्कीच्या नौसैनिकांनी ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडल्याचा दावा तुर्कीने केला आहे. तुर्कीच्या सरकारने या घटनेनंतर ग्रीसला नवी धमकी दिली.

leave a reply