‘डब्ल्यूएचओ-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन`चे उद्घाटन

नवी दिल्ली – भारतातील पारंपारिक औषधांचा डाटाबेस तयार करणे, त्यासंबंधी विद्यांचे संकलन करण्यासह भारतीय पारंपरिक चिकित्सा पद्धती आणि औषधांना जगभरात पोहोचविण्याकरिता ‘डब्ल्यूएचओ-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन`ची (डब्ल्यूएचओ जीसीटीएम) स्थापना करण्यात आली. गुजरातच्या जामनगरमध्ये हे केंद्र सुरू झाले आहे. अशा प्रकारचे जगातील हे पहिलेच केंद्र असून जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

‘डब्ल्यूएचओ-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन`भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, त्याच वर्षात ‘ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन`ची स्थापना भारतात होत आहे. या केंद्रामुळे पुढील पंचवीस वर्षांसाठी पारंपरिक औषधांच्या युगाचा आरंभ झाला आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. जगातील पहिले आयुर्वेदिक विद्यापीठ पाच दशकांपूर्वी जामनगरमध्ये स्थापन झाले होते. त्याच जामनगरमध्ये ‘डब्ल्यूएचओ जीसीटीएम` सुरू होत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच भारताची पारंपरिक चिकित्सा व उपचार पद्धत म्हणजे एक समग्र विज्ञान असल्याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले.

भारताची आयुर्वेदिक उपचार पद्धतीला आज संपूर्ण जगभरात मागणी आहे. काही देशांनी भारतीय आयुर्वेदीक औषधांचा स्वीकार केला आहे. भारताच्या आयुर्वेदाला पाचवा वेद असे संबोधले जाते. कारण तो जगण्याची कला शिकवतो. केवळ उपचारच नव्हेत तर सामाजिक, मानसिक आरोग्य, पर्यावरणाचे आरोग्य या सर्व गोष्टी भारताच्या पारंपरिक उपचार पद्धतीशी जोडलेल्या आहेत. कोणत्या ॠतूमध्ये, कोणत्या वातावरणात काय खावे, संतुलीत आहाराचे महत्वही भारतीय आयुर्वेद शिकवतो. भारतीय योगशास्त्र अनेक रोगांशी सामना करण्यासाठी जगाला उपयोगी ठरत असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

‘डब्ल्यूएचओ-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन` स्थापनेबरोबर पाच ध्येय ठेवण्यात आली आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून पारंपरिक उपचार पद्धती विद्यांचे संकलन करणे, त्याचा डाटाबेस तयार करणे हा यातील पहिले ध्येय असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच पारंपरिक औषधांच्या चाचण्या आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणिकरणाचे प्रयत्नही या जागतिक केंद्राद्वारे केले जातील. तसेच पारंपरिक चिकित्सा व उपचार पद्धतीचे तज्ज्ञ एकत्र येतील असे व्यासपीठ या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. तसेच पारंपरिक औषधांवर संशोधन, त्यासाठी आवश्‍यक निधीची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच आधुनिक व पारंपरिक उपचारांचा लाभ व्हावा यासाठी एक प्रोटोकॉलही विकसित केला जाणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply