पाश्‍चिमात्य लष्कराच्या माघारीने अफगाणिस्तानचे अस्तित्व धोक्यात येईल – अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला

काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने देशभरात केलेल्या कारवाईत तालिबानच्या 258 दहशतवाद्यांना ठार केले. तर तालिबानने पाकतिकामधील पूल उद्ध्वस्त केला. युरोपिय देशांची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार पूर्ण होत असून 4 जुलैपर्यंत अमेरिकेचे नियोजित लष्करही माघारी परतणार असल्याच्या बातम्या आहेत. तालिबानचे वाढते हल्ले आणि पाश्चिमात्य देशांची सैन्यमाघार यावर अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी चिंता व्यक्त केली. ‘पाश्चिमात्य लष्कराच्या माघारीमुळे अफगाणिस्तानचे अस्तित्व, सुरक्षा आणि ऐक्य धोक्यात आले आहे’, असा इशारा अब्दुल्ला यांनी दिला.

गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानात जोरदार लष्करी धडक मारली आहे. तालिबानसमोर अफगाणी जवानांनी शरणांगती पत्करल्याच्या व पळ काढल्याच्या बातम्या आहेत. तर अफगाण लष्कर मात्र तालिबानचे हल्ले थोपविल्याचे सांगत आहे. गुरुवारी अफगाणी लष्कराने तालिबानच्या विरोधात 15 प्रांतांमध्ये कारवाई केल्याची माहिती दिली. या संघर्षात तालिबानचे 258 दहशतवादी ठार, तर 142 जण जखमी झाले. तर हेरात प्रांतात लष्कराने तालिबानला माघार घेण्यास भाग पाडल्याचे दावे अफगाणी माध्यमांनी केले.

पण स्थानिक मात्र तालिबानचे हल्ले तीव्र झाल्याचे सांगत आहेत. पाकिस्तानच्या सीमेजवळील भागात तालिबानचे हल्ले अधिकच तीव्र झाल्याचा दावा केला जातो. गुरुवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी पाकतिका येथील महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला. तर गेल्या महिन्याभरात तालिबानने अफगाणी लष्कराकडून 700 लष्करी वाहनांचा ताबा घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला. यापैकी काही लष्करी वाहने तालिबानने ड्युरंड सीमेपलिकडील पाकिस्तानी लष्कराला सुपूर्द केल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

या परिस्थितीवर अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी चिंता व्यक्त केली. गेल्या काही दिवसांमध्ये जर्मनी, इटलीच्या लष्कराची अफगाणिस्तानातील माघार पूर्ण झाली आहे. तर येत्या तीन दिवसात, 4 जुलैपर्यंत अमेरिकाही सैन्यमाघारी पूर्ण करणार असल्याचे बोलले जाते. ‘पाश्चिमात्य देशांच्या या माघारीमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षेच्या आघाडीवर मोठी पोकळी निर्माण होईल’, अशी चिंता अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

‘या सैन्यमाघारीनंतर तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले वाढतील व यामुळे आपल्या देशाचे अस्तित्व, सुरक्षा व ऐक्य धोक्यात येईल. अफगाण सरकार आणि जनतेला शांतता हवी असली तरी तालिबान मात्र राजधानी काबुलच्या दिशेने पावले टाकीत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील प्रत्येक गटांमध्ये एकजूट असणे आवश्यक आहे’, असे आवाहन अब्दुल्ला यांनी केले.

दरम्यान, अमेरिका व नाटो लष्कराच्य पूर्ण माघारीनंतर तालिबान पुन्हा या देशाचा ताबा घेईल. तसेच येत्या काळात अफगाणिस्तानात नव्याने गृहयुद्ध पेटेल, असा इशारा अमेरिकेचे लष्करी अधिकारी तसेच माजी नेते व विश्लेषक देत आहेत. या माघारीनंतरही अमेरिकेचे 600 हून अधिक जवान अफगाणिस्तानात तैनात असतील, अशी माहिती समोर आली होती. तरीही तालिबानचे वाढते हल्ले व त्यांना पाकिस्तानचे मिळणारे समर्थन याकडे अमेरिकी, अफगाणी नेते व अधिकारी लक्ष वेधत आहेत.

leave a reply