काबुल/वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील तालिबानने महिलांच्या विद्यापीठातील प्रवेशावर बंदी जाहीर केली. यावर जगभरातून प्रतिक्रिया आली आहे. अमेरिका, युरोपिय महासंघ आणि संयुक्त राष्ट्रसंघाने तालिबानच्या या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. महिलांचे शिक्षण रोखल्याचे त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी अमेरिकेने दिली आहे.
वर्षभरापूर्वी राजधानी काबुलचा ताबा घेतल्यानंतर तालिबानच्या राजवटीने महिला व मुलींच्या शिक्षणाबाबत सौम्य भूमिका स्वीकारणार असल्याची घोषणा केली होती. पण मंगळवारी तालिबानने देशभरातील विद्यापीठांमध्ये महिलांना प्रवेश दिला जाणार नसल्याची घोषणा केली. तालिबानचा अधिकारी महिलांना रोखत असल्याचा फोटोग्राफही प्रसिद्ध झाला आहे.
जोपर्यंत तालिबान अफगाणिस्तानातील महिलांच्या अधिकारांचा आदर करीत नाही, तोपर्यंत कुठलाही देश तालिबानच्या राजवटीला समर्थन देऊ शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला.